india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या जयंतीनिमित्त डॉ. सूर्यप्रकाश कोठेंचा स्तुत्य उपक्रम; पत्रकारांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सोलापूर (प्रतिनिधी) :

 

स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सामाजिक बांधिलकीतून प्रख्यात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोठे यांनी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील महालक्ष्मी बँक्वेट हॉलमध्ये पार पडलेल्या या शिबिरात प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमातील मोठ्या संख्येने पत्रकारांनी सहभाग घेत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
या शिबिराचे उद्घाटन सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आणि ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत पाटणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. सूर्यप्रकाश कोठे, ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळ्ये, इन सोलापूर न्यूजचे चॅनेलप्रमुख समाधान वाघमोडे, दैनिक सकाळचे संपादक सिद्धाराम पाटील, एबीपी माझाचे राजकुमार शास्त्री, दैनिक नवराष्ट्रचे संपादक राजकुमार नरोटे, डिजिटल मीडिया संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार बाबर, यल्लादास गड्डम, व्यंकटेश चिलका आणि श्रीनिवास चिलका यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

प्रास्ताविकात डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी पत्रकारांचे काम अत्यंत धकाधकीचे व तणावपूर्ण असल्याने अनेकदा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत पत्रकारांसारख्या समाजाच्या महत्त्वाच्या घटकासाठी त्यांनी हाती घेतलेला हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरला.सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी डॉ. कोठे यांच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक करत पत्रकारांसाठी मेडिक्लेम योजनेच्या दृष्टीने एखाद्या रुग्णालयासोबत टायअप करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

 

ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळ्ये यांनी स्व. तात्यांपासून कोठे कुटुंब समाजसेवेत अग्रस्थानी राहिले असून, त्याच समाजाभिमुख परंपरेचा वारसा डॉ. सूर्यप्रकाश कोठे समर्थपणे पुढे नेत असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
शिबिरामध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT), हिपॅटायटिस-बी (HBsAg), हिपॅटायटिस-सी (Anti-HCV), रँडम ब्लड शुगर (BSL), संगणकीकृत नेत्र तपासणी तसेच फॅब्रोस्कॅन अशा अत्याधुनिक तपासण्या मोफत करण्यात आल्या. त्यामुळे पत्रकारांना एकाच ठिकाणी सर्वंकष आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध झाली.

 

 

यावेळी ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत पाटणकर यांनी “धावपळीच्या जीवनात ताणतणाव व्यवस्थापन” या विषयावर मार्गदर्शन केले. पत्रकारितेच्या तणावपूर्ण कार्यपद्धतीत मानसिक आरोग्य कसे जपावे याविषयी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वासुदेव इप्पलपल्ली यांनी केले.
डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकारांच्या आरोग्याला प्राधान्य देत राबविलेला हा सामाजिक उपक्रम उपस्थितांकडून आणि पत्रकारांकडून विशेष कौतुकाचा विषय ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button