india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

हुतात्मा स्मृती मंदिराचे होणार नूतनीकरण; एसटीपीचे प्रक्रिया केलेले पाणी बांधकामासाठी नाममात्र दरात उपलब्ध होणार

शहरातील प्रलंबित विकासकामांना गती देण्याचा महापौर विनायक कोंड्याल यांचा निर्णय; उद्यानांसह दुभाजकांतील झाडांच्या देखभालीबाबतही सूचना

 

सोलापूर

सोलापूर शहरातील विविध प्रलंबित विकासकामे, नागरी सुविधा आणि पर्यावरण संवर्धनाच्या विषयांना गती देण्यासाठी महापौर कार्यालयात महापौर श्री विनायक रामकृष्ण कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेचे प्रमुख पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील विविध प्रश्नांची वस्तुस्थिती आयुक्तांसमोर मांडण्यात आली. त्यानंतर संबंधित विषयांना आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत हिरवा कंदील दिला. हे विषय तातडीने अजेंड्यावर घेऊन आवश्यक कार्यवाही करत मार्गी लावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, सभागृह नेते नरेंद्रजी काळे, स्थायी समिती सभापती रंजिताताई चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणीताई तडवळकर, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम,उद्यान सभापती राजशेखर पाटील, आरोग्य सभापती सुनील खटके, विधी सभापती सत्यजित वाघमोडे स्थापत्य समिती सभापती विजय चिप्पा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार नगर अभियंता नीलकंठ मठपती यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

हुतात्मा स्मृती मंदिराचे होणार नूतनीकरण व सुशोभीकरण

सोलापूर शहराची सांस्कृतिक ओळख असलेल्या हुतात्मा स्मृती मंदिराचे गेल्या पंधरा वर्षांपासून कोणतेही मोठे नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे या नाट्यगृहाच्या सुधारणेसाठी महापौरांनी विशेष पुढाकार घेतला आहे. यामध्ये नाट्यगृहातील खुर्च्यांची दुरुस्ती व आवश्यकतेनुसार बदल, हुतात्मा स्मृती मंदिर मधील स्टेज, छताची दुरुस्ती, मध्यवर्ती वातानुकूलन यंत्रणेची सुधारणा, तसेच नाट्यगृहाच्या मागील बाजूस असलेल्या कलाकारांच्या विश्रामखोल्यांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी आवश्यक कार्यवाही तातडीने सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

एसटीपीचे प्रक्रिया केलेले पाणी बांधकामासाठी नाममात्र दरात उपलब्ध होणार

सोलापूर शहरात सध्या पाण्याची वाढती गरज आणि पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता पिण्यायोग्य पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमधून (एसटीपी) प्रक्रिया केलेले पाणी बांधकाम व्यावसायिकांना नाममात्र दरात उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. साधारणतः १२० ते १५० रुपये दरात टँकरद्वारे हे पाणी बांधकामासाठी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

शहरातील चार एसटीपी प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प सध्या कार्यरत असून, त्यांच्यामार्फत दररोज सुमारे ७० ते ८० एमएलडी प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध होते. या पाण्याचा अधिकाधिक पुनर्वापर व्हावा, यासाठी महापालिका विशेष प्रयत्न करणार आहे. बांधकाम व्यावसायिकांना हे पाणी उपलब्ध करून दिल्यास पिण्यायोग्य पाण्यावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

दुभाजकांतील झाडांना नियमित पाणी देण्याच्या सूचना

शहरातील रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये लावण्यात आलेली झाडे आणि वृक्षांचे योग्य संवर्धन व्हावे, यासाठी महापौरांनी उद्यान विभागाला विशेष सूचना दिल्या. दुभाजकांमधील झाडांना नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणी देण्यात यावे, त्यांची योग्य निगा राखावी तसेच झाडे सुकणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश संबंधित मक्तेदार आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.

 

 

एसटीपीमधून उपलब्ध होणाऱ्या प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर रस्त्यांच्या दुभाजकांतील झाडे, शहरातील उद्याने आणि बगीच्यांच्या सिंचनासाठी करण्यावरही भर देण्यात आला. यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होण्याबरोबरच शहरातील हरित क्षेत्राचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे.

उद्यानांच्या देखभालीवर विशेष भर

शहरातील विविध उद्यानांची स्वच्छता, हिरवळ, झाडांचे संवर्धन, पाणीपुरवठा आणि नागरिकांना उपलब्ध असलेल्या सुविधांचा आढावा घेण्यात आला. उद्यानांची नियमित देखभाल करावी, नागरिकांना स्वच्छ व सुंदर उद्याने उपलब्ध करून द्यावीत, तसेच उद्यान विभाग आणि संबंधित मक्तेदारांनी आपल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडाव्यात, अशा सूचना महापौरांनी दिल्या.

शहरातील पाणी बचत, पर्यावरण संवर्धन, सांस्कृतिक वारशाचे जतन आणि नागरी सुविधांचा दर्जा उंचावणे या बाबींना प्राधान्य देऊन सर्व प्रलंबित विषय वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button