पॉक्सो प्रकरणातील आरोपी सद्दाम शेख यास वैद्यकीय उपचारासाठी उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर:- ॲड प्रणव उपाध्ये….

सोलापूर
कामती पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला सद्दाम रशीद शेख यास वैद्यकीय उपचारासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने १५ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला.
यात थोडक्यात हकीकत अशी की,
न्यायालयीन कोठडीत असताना आरोपीला आकडीचे (झटके) येण्याचे त्रास झाल्याने सिव्हिल हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी मेंदूचा एमआरआय तपासणी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, एमआरआय तपासणी करण्यासाठी आरोपीच्या दातांवरील डेंटल क्राउन काढणे आवश्यक होते.
सदर प्रकरणात यापूर्वी सोलापूर येथील विशेष पॉक्सो न्यायालयाने आरोपीला खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी एस्कॉर्ट व सुरक्षा व्यवस्थेसह दिली होती. मात्र, एस्कॉर्ट व सुरक्षा व्यवस्थेसाठी येणारा खर्च आरोपीच्या कुटुंबीयांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे परवडणे शक्य नसल्याने आरोपीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच येथे वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला.
याबाबत सुनावणी वेळी मा.उच्च न्यायालयाने सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर येथे आवश्यक उपचार उपलब्ध आहेत किंवा नाहीत, याबाबत सरकारी पक्षाकडून सूचना मागविल्या होत्या. त्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आवश्यक उपचार उपलब्ध नसल्याचा अहवाल सरकारी वकिलांनी न्यायालयात सादर केला.
सदर अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीच्यावतीने बाजू मांडताना ॲड प्रणव उपाध्ये यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आवश्यक उपचार उपलब्ध नसणे, खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी लागणारा एस्कॉर्ट व सुरक्षा व्यवस्थेचा खर्च कुटुंबीयांना परवडणे शक्य नसणे, उपचार पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी निश्चित नसणे तसेच आरोपीला तातडीने वैद्यकीय उपचार मिळण्याची आवश्यकता या सर्व बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. या सर्व बाबींचा विचार करून उच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती श्री. नीरज पी. धोटे यांनी आरोपीला १५ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड प्रणव उपाध्ये, अॅड.मुरलीधर खरात, ॲड ईश्वरी न्यामणे यांनी तर सरकारतर्फे ॲड नितीन पाटील यांनी काम पाहिले.



