india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

अफजलखानाचा वध हा केवळ तलवारीचा पराक्रम नव्हे, तर शिवरायांच्या बुद्धिचातुर्याचा विजय

लेखणी, वाणी आणि तलवार या तिन्ही शस्त्रांचा अचूक वापर करणारे छत्रपती शिवाजी महाराज : डॉ. शिवरत्न शेटे यांचे प्रतिपादन

 

सोलापूर (प्रतिनिधी) :

 

अफजलखानाचा वध म्हणजे केवळ दोन योद्ध्यांमधील तलवारीचे युद्ध नव्हते, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य युद्धनीतीचा, मुत्सद्देगिरीचा, गुप्तहेर यंत्रणेचा आणि बुद्धिचातुर्याचा तो ऐतिहासिक विजय होता. गरज पडली तेव्हा महाराजांनी लेखणी चालवली, गरज पडली तेव्हा वाणीचा प्रभाव दाखवला आणि वेळ आली तेव्हा तलवारीचा अचूक वापर केला. लेखणी, वाणी आणि तलवार या तिन्ही शस्त्रांचा प्रभावी वापर करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक इतिहासातील अद्वितीय राजे होते, असे प्रतिपादन प्रख्यात शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले.

श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आयोजित ‘प्रतापगडाचा रणसंग्राम : गोष्ट शिवरायांच्या अनोख्या युद्धकौशल्याची’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

अफजलखानाच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडताना डॉ. शेटे यांनी त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्याचे लष्करी सामर्थ्य, विजापूरमधील बांधकामे आणि त्याच्या युद्धकौशल्याचे संदर्भ दिले. अफजलखान हा केवळ ताकदवान सरदार नव्हता, तर कपटी राजकारणी आणि युद्धनीतीचा जाणकार होता. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी महाराजांनी पारंपरिक युद्धपद्धतीऐवजी वेगळी रणनीती आखली होती.

शिवाजी महाराजांनी कोकणातील राजकीय घडामोडी, आरमाराची वाढती ताकद आणि आदिलशाही-मोगल सत्तांसमोरील आव्हाने यांचा अभ्यास करून आपली रणनीती आखली. अफजलखानाला स्वराज्यावर चाल करून येण्याची जबाबदारी देण्यात आली. त्याने वाटेत अनेक ठिकाणी दहशत निर्माण केली. महाराजांचे नातेवाईक बजाजी निंबाळकर यांना धर्मांतराच्या संकटाला सामोरे जावे लागले. त्यावेळी महाराजांनी खंडणी देऊन त्यांची सुटका घडवून आणल्याचा ऐतिहासिक संदर्भही त्यांनी मांडला.

अफजलखानाने पुणे, सुपे, सासवड आणि शिरवळ परिसरातील महत्त्वाच्या ठाण्यांवर आपले सरदार पाठवून आदिलशाहीचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाराजांनी घाईघाईने युद्धाला सामोरे जाण्याऐवजी परिस्थितीचा अंदाज घेत रणनीती आखली. नेताजी पालकर यांच्यासारख्या शूर सरदारांना आवर घालत त्यांनी योग्य वेळेची प्रतीक्षा केली. ही माघार नसून शत्रूला गाफील ठेवण्याची युद्धनीती होती.

खानाच्या विश्वासघाताला महाराजांनी मुत्सद्देगिरीने दिले प्रत्युत्तर!

अफजलखानाने स्वराज्यातील काही देशमुखांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला. खंडोजी खोपडे यांच्यासारख्या व्यक्तींना आपल्या गोटात सामील करून घेण्याची खेळीही त्याने केली. मात्र, महाराजांच्या गुप्तहेर यंत्रणेने शत्रूच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले होते. बहिर्जी नाईक यांच्यासारख्या गुप्तहेरांनी मिळवलेली माहिती स्वराज्याच्या युद्धनीतीसाठी महत्त्वपूर्ण ठरली.

प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीची जागा निश्चित करताना महाराजांनी अफजलखानाच्या मनात आपल्याविषयी कमी लेखण्याची भावना निर्माण होऊ दिली. महाराज घाबरले आहेत, ते युद्धाला तयार नाहीत, असा समज खानाच्या मनात निर्माण झाला. प्रत्यक्षात ही महाराजांची अत्यंत विचारपूर्वक आखलेली खेळी होती.

 

 

 

 

१० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या ऐतिहासिक भेटीत अफजलखानाने दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाराजांनी वाघनखे आणि बिचव्याच्या साहाय्याने त्याचा प्रतिकार केला. त्यानंतर स्वराज्याच्या सैन्याने नियोजनबद्ध हल्ला चढवत आदिलशाही सैन्याचा पराभव केला.

 

 

 

अफजलखानाच्या वधामागे केवळ शारीरिक शौर्य नव्हते, तर शत्रूच्या मानसिकतेचा अभ्यास, योग्य वेळेची निवड, गुप्तहेर यंत्रणा, मुत्सद्देगिरी आणि अचूक युद्धनियोजन होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या असामान्य युद्धकौशल्याचा इतिहास प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे, असे आवाहनही डॉ. शेटे यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button