india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

प्रतापगडाच्या रणसंग्रामाचा थरार सोलापूरकरांसमोर उलगडणार!

रविवारी डॉ. शिवरत्न शेटे यांचे जाहीर व्याख्यान; श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचा पुढाकार

 

शिवरायांच्या युद्धनीतीचा, अफझलखान वधाच्या सूक्ष्म नियोजनाचा आणि मावळ्यांच्या शौर्याचा रोमांचकारी इतिहास ऐकण्याची संधी

सोलापूर

 

हिंदवी स्वराज्यावर चाल करून आलेल्या बलाढ्य अफझलखानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेला वध हा मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णक्षण मानला जातो. केवळ शारीरिक ताकद, सैन्यबळ आणि साधनसामग्री नव्हे, तर बुद्धिचातुर्य, अचूक नियोजन आणि युद्धकौशल्याच्या जोरावर बलाढ्य शत्रूला कसे पराभूत करता येते, याचा वस्तुपाठच शिवरायांनी घालून दिला. याच ऐतिहासिक पराक्रमाची रोमांचकारी गाथा आता सोलापूरकरांना अनुभवता येणार आहे.

 

 

 

श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने ‘प्रतापगडाचा रणसंग्राम : गोष्ट शिवरायांच्या अनोख्या युद्धकौशल्याची’ या विषयावर प्रख्यात शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता डाळिंबी आड मैदान, शिंदे चौक, सोलापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे.

 

 

 

अफझलखानाने सुमारे ३५ हजारांची फौज आणि प्रचंड युद्धसामग्री घेऊन स्वराज्यावर आक्रमण केले होते. या मोहिमेदरम्यान त्याने हिंदू देवदेवतांची मंदिरे उद्ध्वस्त करून रयतेवर अत्याचार केले. अशा बलाढ्य शत्रूसमोर शिवरायांचा निभाव लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, शिवरायांनी आपल्या असामान्य युद्धनीतीने खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी येण्यास भाग पाडले आणि त्याचा वध करून स्वराज्याच्या सामर्थ्याची जगाला जाणीव करून दिली.

 

 

 

 

या ऐतिहासिक लढाईत संभाजी कावजी, वीर जिवा महाले यांच्यासह मावळ्यांनीही अतुलनीय पराक्रम गाजवला. खानाच्या भेटीपूर्वी शिवरायांनी केलेले सूक्ष्म नियोजन, गनिमी काव्याचा प्रभावी वापर आणि प्रत्येक मावळ्याने पार पाडलेली जबाबदारी हा युद्धइतिहासातील अभ्यासाचा महत्त्वपूर्ण विषय आहे. या विजयामुळे हिंदवी स्वराज्याचा पाया अधिक भक्कम झाला आणि स्वराज्य विस्ताराला नवी दिशा मिळाली.

शिवरायांच्या या अद्वितीय युद्धकौशल्याचा इतिहास डॉ. शिवरत्न शेटे आपल्या प्रभावी वाणीमधून उलगडणार आहेत. त्यामुळे हे व्याख्यान शिवप्रेमींसाठी ऐतिहासिक पर्वणी ठरणार आहे.

 

 

 

 

शहरातील तमाम शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांच्या पराक्रमाची गाथा ऐकावी आणि हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकांना मानवंदना अर्पण करावी, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष नानासाहेब काळे, उत्सव अध्यक्ष जयवंत सलगर आणि उत्सव कार्याध्यक्ष उत्तरा बरडे-बचुटे यांनी केले आहे.
चौकट
शिवप्रेमींसाठी व्याख्यानाची पर्वणी!
प्रतापगडाचा रणसंग्राम
गोष्ट शिवरायांच्या अनोख्या युद्धकौशल्याची
व्याख्याते : डॉ. शिवरत्न शेटे
वार : रविवार, १५ नोव्हेंबर २०२६
वेळ : सायंकाळी ७ वाजता
स्थळ : डाळिंबी आड मैदान, शिंदे चौक, सोलापूर
आयोजक : श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ, सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button