मुंबई उच्च न्यायालयाचा दणका ! खेड तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांचे निलंबन रद्द. बेडसे पाटील पुन्हा तहसीलदार खेड पदी रुजू होणार…

जून 2023 पासून तहसीलदार खेड या पदावर कार्यरत असणाऱ्या प्रशांत बेडसे पाटील यांना दि 11.7.2024 रोजी तहसीलदार मोहोळ येथील कार्यकाळात कोविड प्रोटोकॉलचे पालन न केल्याचे कारण नमूद करीत राज्य शासनाने अचानकपणे निलंबित केले होते. त्यानंतर 3 दिवसात तहसीलदार ज्योती देवरे यांची तहसीलदार खेड पदी बदली केली होती.
सदर प्रकरणी बेडसे पाटील यांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. सदर याचिकेची सुनावणी पूर्ण होऊन माननीय उच्च न्यायालयाने प्रशांत बेडसे यांचे निलंबन रद्दबातल केले आहे.तसेच नमूद केले आहे की ज्या बाबीसाठी किरकोळ शिक्षा देणे योग्य आहे त्या साठी कठोर शिक्षेची उपाय योजना करणे अन्यायकारक आहे. तसेच बेडसे पाटील हे निलंबित तारखेपासून सेवेत असून त्यांना सेवेचे सर्व लाभ देणेबाबत राज्यशासनास आदेशित केले आहे. तसेच राज्य शासनाने त्यांना असणारे निलंबनाचे अधिकार संपूर्ण विचारांती व खरोखरच एखाद्या अधिकाऱ्यास पदावरून दूर करणे आवश्यक असल्यासच त्याची सविस्तर कारणे नमूद करूनच वापरावे असे देखील निर्देशित केले आहे.
तहसीलदार बेडसे निलंबित झाल्यानंतर त्या पदी केवळ तीन दिवसात ज्योती देवरे यांची वर्णी लावण्यात आली होती. सदर बदलीसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी असणे आवश्यक होते परंतु ती परवानगी न घेता तत्कालीन महसूल मंत्री विखे पाटील यांनी बदलीला मान्यता दिली होती. राज्य शासनाने याबाबतचे सर्व कागदपत्रे कोर्टात सादर केली आहेत. त्यामध्ये ज्योती देवरे यांची बदली करण्यासाठी आयोगाची परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच नागरी सेवा मंडळाची बैठक देखील न घेता बदलीचे आदेश पारित करण्यात आले होते. सदर संपूर्ण कागदपत्रे कोर्टात सादर करण्यात आली असता कोर्टाने त्याबाबत निरीक्षण नोंदवत ज्योती देवरे यांच्या बदली बाबत MAT ने 4 आठवड्यात निर्णय घ्यावा असे नमूद केले आहे. त्यामुळे ज्योती देवरे यांना अति प्रशासकीय कार्यक्षमता दाखवत तहसीलदार खेड पदी देण्यात आलेली नियुक्ती नियमबाह्य ठरून रद्द होण्याची व त्या ठिकाणी पुन्हा प्रशांत बेडसे पाटील यांची नियुक्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.