“मराठा समाजावर अन्याय सहन केला जाणार नाही” – मराठा आंदोलक राम जाधवांचा इशारा; आंदोलनाची भाजप नेतृत्वाने घेतली दखल…

सोलापूर
सोलापूर महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजावर राजकीय अन्याय झाल्याचा आरोप करत मराठा आंदोलक राम (भैय्या) जाधव यांनी छेडलेल्या आंदोलनाची अखेर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने दखल घेतल्याचे चित्र समोर आले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत मराठा व कुणबी मराठा समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्हा परिषद गटनेतेपदी रश्मी बागल, प्रतोदपदी चेतन केदार तर प्रवक्ते म्हणून नेताजी खंडाळगे यांची निवड करण्यात आली आहे.

सोलापूर महापौर निवडीदरम्यान मराठा समाजाला संधी नाकारण्यात आल्याने समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करत राम जाधव यांनी गेल्या महिनाभरापासून विविध प्रकारची आंदोलने छेडली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून त्यांनी आपला तीव्र निषेध नोंदवला. याशिवाय त्यांनी मुंडण आंदोलन, मूक आंदोलन, अर्धनग्न आंदोलन अशा विविध मार्गांनी सरकार आणि पक्ष नेतृत्वाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. रंगपंचमीच्या दिवशी काळ्या रंगाने रंगपंचमी साजरी करूनही त्यांनी निषेध व्यक्त केला.

राम जाधव यांनी आरोप केला की, १९९३ नंतर तब्बल ३२ वर्षांनी सोलापूर शहरात मराठा समाजाला महापौर होण्याची संधी उपलब्ध झाली होती. मात्र ही संधी हिरावून घेतल्याने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. या प्रकरणासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे आणि शहराध्यक्ष तडवळकर यांना जबाबदार धरत त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रमुख मागण्या
राम जाधव यांनी आंदोलनाच्या माध्यमातून काही ठोस मागण्या पुढे केल्या आहेत. त्यामध्ये –
सध्याचे महापौर विनायक कोंड्याल यांनी राजीनामा देऊन मराठा समाजातील व्यक्तीला महापौरपद द्यावे.
जिल्हा परिषद अध्यक्षपद पहिले सव्वा वर्ष कुणबी मराठा समाजाला देण्यात यावे.
सोलापूर महापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ असून त्यापैकी सध्याचे महापौर कोंड्याल यांचा सव्वा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर उर्वरित सव्वा वर्ष मराठा समाजाला संधी द्यावी.

आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
राम जाधव यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, येत्या १९ तारखेपर्यंत जिल्हा परिषद अध्यक्षपद कुणबी मराठा समाजाला आणि सोलापूर महापौरपद मराठा समाजाला देण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर मराठा समाजाकडून भाजपविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल.
“मराठा समाजाच्या सन्मानासाठी हा लढा उभा केला आहे. समाजावर झालेला राजकीय अन्याय सहन केला जाणार नाही. योग्य निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन उभे राहील आणि भाजपच्या नेत्यांना राज्यात फिरणे कठीण होईल,” असा इशारा राम जाधव यांनी दिला आहे…



