ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने ‘भाऊ चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला उत्साहात प्रारंभ…
अशा स्पर्धांतून ग्रामीण- शहरी भागातील गुणवंत क्रिकेटपटूंना मोठे व्यासपीठ मिळते- महापौर विनायक कोंडयाल

सोलापूर :
ईच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच प्रभाग क्र. २२ चे भाजप नगरसेवक किसन (भाऊ) जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘भाऊ चषक’ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी नेहरूनगर येथील शासकीय क्रीडांगणावर महापौर विनायक कोंडयाल व सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या शुभहस्ते उत्साहात झाले. यावेळी नगरसेवक किसन जाधव, नगरसेविका चैत्राली शिवराज गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड, चेतन नागेश (अण्णा) गायकवाड, प्रेम गायकवाड व कार्तिक जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार नगरसेवक किसन जाधव यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी महापौर विनायक कोंडयाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगरसेवक किसनभाऊ जाधव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत, अशा स्पर्धांमुळे युवकांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे सांगितले.

ग्रामीण व शहरी भागातील प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सभागृह नेते नरेंद्र काळे यांनीही स्पर्धेचे कौतुक करत युवकांनी क्रीडाक्षेत्रात मोठी भरारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. नगरसेवक किसन जाधव म्हणाले, ‘भाऊ चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा उद्देश केवळ सामने आयोजित करणे नसून, टेनिस क्रिकेटला जागतिक दर्जाची ओळख मिळावी आणि येथील खेळाडूंना मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचण्याची संधी मिळावी, यासाठीचा हा छोटासा प्रयत्न आहे. २२ ते २५ जुलैदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत १६ संघ आणि सुमारे २५० खेळाडू सहभागी होत आहेत.

प्रथम पारितोषिक रु ४६,००० व ट्रॉफी, द्वितीय रु २३,००० व ट्रॉफी, तृतीय रु ११,००० व ट्रॉफी देण्यात येणार असून, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज व मालिकावीर असे वैयक्तिक पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ईच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत असून, चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत रंगतदार सामने क्रिकेटप्रेमींसाठी आकर्षण ठरणार आहेत.




