इतिहासात प्रथमच रामवाडीत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन; ‘ईच्छा भगवंताची परिवारा’कडून भक्तिभावाने भव्य स्वागत
संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखी आगमन सोहळा तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वारकरी संप्रदायातील भक्तगणांसाठी राजगिरा लाडू चे वाटप

सोलापूर
आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त श्री क्षेत्र शेगावचा राणा, संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे इतिहासात प्रथमच रामवाडी परिसरात आगमन झाल्याने संपूर्ण परिसर भक्ती, श्रद्धा आणि हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला. रेल्वे पुलाच्या कामामुळे यंदा पालखीचा मार्ग बदलल्याने प्रथमच रामवाडीतील वारकरी भक्तांना महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्याचा योग लाभला. टाळ-मृदुंगाचा निनाद, “गण गण गणात बोते”चा जयघोष आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात भाविकांनी महाराजांच्या पालखीचे दर्शन घेत भक्तिसागरात तल्लीन होत आध्यात्मिक आनंद अनुभवला ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने गुलाब पुष्पांची भव्य पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत करण्यात आले. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वारकरी संप्रदायातील भाविकांना राजगिरा लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, ईच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव, श्री सद्गुरू बसवारुढ मठाचे मठाधिपती श्री शिवपुत्र आप्पाजी, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, नगरसेविका चैत्रालीताई गायकवाड, सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा, श्रीमती लक्ष्मी दत्तात्रय नडगिरी, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत भाजपा नगरसेवक किसन जाधव यांनी केले यावेळी श्री शिवपुत्र आप्पाजी यांनी नामस्मरण, सेवाभाव आणि संत परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत, संतांच्या चरणस्पर्शाने भूमी पावन होते आणि समाजात प्रेम, समता व भक्तीची भावना दृढ होते, असे सांगितले.

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर व स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी सामूहिक मनोगतात, इतिहासात प्रथमच श्री गजानन महाराजांची पालखी रामवाडीत आल्याने संपूर्ण परिसर धन्य झाला असून वारकरी संप्रदायाची सेवा, समता आणि भक्तीची परंपरा अधिक बळकट होईल. महाराजांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समाधान व आध्यात्मिक उन्नती लाभो, अशी प्रार्थना व्यक्त केली. ईच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक तथा नगरसेवक किसन जाधव म्हणाले, श्री गजानन महाराजांच्या दिंडीच्या इतिहासात प्रथमच पालखी रामवाडीत आली, हा आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे.
महाराजांच्या आगमनाने संपूर्ण परिसरात नवचैतन्य आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून ही सेवा पुढेही अखंड सुरू राहील. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू ब्रदर जाधव, अजिंक्य जाधव, कार्तिक जाधव, तेजस गायकवाड, उत्कर्ष गायकवाड, माणिक कांबळे, वसंत कांबळे, फिरोज पठाण, महादेव राठोड, श्रीकांत गिड्डे, यल्लाप्पा शिवपुरे, हुलगप्पा शासम, उत्तम देडे, गोपाळ जाधव, पवन बेरे, किरण सगटे, विकी सगटे यांच्यासह ईच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. मोठ्या भक्तिमय, मंगलमय आणि हरिनामाच्या गजरात पालखी सोहळा संपन्न झाला.



