crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी; जामगाव येथील खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, आरोपी जेरबंद

युट्युब पाहून केला गुन्हा

 

सोलापूर ग्रामीण : प्रतिनिधी

दिनांक २५.०८.२०२६ रोजी रात्री ९.०० ते २६.०८.२०२६ सकाळी ११.३० च्या दरम्यान जामगाव, ता. माढा येथे फिर्यादीचे राहते घरात अज्ञात चोरट्याने बळजबरीने प्रवेश करून फिर्यादीचे वडील अशोक भीमान्ना मुळे (वय ६१) यांना घातक हत्याराने डोक्यात मारहाण करून जीवे ठार मारले आणि घरातील लोखंडी कपाट उचकटून २,४०,००० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद विजयकुमार अशोक मुळे (वय ३०) यांनी दिली होती. त्यावरून माढा पोलीस ठाणे गु.र.नं. २२९/२०२६ बीएनएस कलम १०३(१), ३३१(७) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

 

 

 

गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने घटनास्थळी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी भेट देऊन माहिती घेतली. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना समांतर तपासासाठी ४ स्वतंत्र पथके तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.

 

 

 

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या पथकाने गुन्हा घडल्यानंतर ३ दिवस जामगावात तळ ठोकून घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले. घटनास्थळाजवळ मिळालेल्या परिस्थितीजन्य पुराव्यावरून आरोपीबाबत सुगावा लागला. गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हा गुन्हा जामगावचा रहिवासी अजयकुमार गौतम चव्हाण याने मोटारसायकलचा वापर करून केला आहे.

माहिती घेतली असता तो मागील दोन वर्षांपासून जामगावात न राहता लऊळ, ता. माढा येथे राहत असून अधूनमधून जामगावात येत असल्याचे समजले. पोलीस पथक पाठीवर असल्याचा संशय आल्याने त्याने मोबाईल बंद करून पलायन केले होते. सीसीटीव्ही फुटेजवरून तो कलबुर्गी, कर्नाटक भागात असल्याचे समजले.

 

 

 

पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सपोनि विजय शिंदे, सपोफौ नारायण गोलेकर व पथकाला कलबुर्गीला रवाना केले. वाडी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर तो वावरत असल्याची माहिती मिळाल्याने वाडी रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीचे नाव अजयकुमार गौतम चव्हाण (वय ३१, रा. जामगाव, हल्ली रा. लऊळ, ता. माढा) असे आहे.

चौकशीत त्याने कबुली दिली की, कर्जबाजारी झाल्याने पैशाची गरज असल्याने चोरीच्या उद्देशाने तो फिर्यादीच्या घराच्या पाठीमागील पाईपवरून घरात शिरला. वरच्या खोलीचे लोखंडी कुलूप त्याने *युट्युब व्हिडिओमध्ये पाहिलेल्या पद्धतीने सिरिंजच्या सहाय्याने कुलपात पेट्रोल टाकून पेटवून* उघडले. कपाट उचकटत असताना झोपलेले अशोक मुळे जागे झाले व त्यांनी त्याला ओळखल्याने त्याने जवळील हातोड्याने त्यांच्या डोक्यात जबर मारहाण करून जीवे ठार मारले आणि दागिने चोरून पळ काढला.

आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी माढा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पुढील तपास माढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि रोहित शिंदे करीत आहेत.

 

 

 

 

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे (पंढरपूर विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली सपोनि विजय शिंदे, बालाजी कांबळे, संजय राठोड व पथकातील नारायण गोलेकर, सलीम बागवान, रवि माने, अतुल घाडगे, दशरथ गोरे, बाबासाहेब मुंडे, अश्विनी गोटे, अनवर अत्तार, समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, योगेश जाधव, सुरज रामगुडे, प्रमोद गायकवाड, मनोज राठोड, रतन जाधव, सुनील पवार तसेच माढा पोलीस ठाण्याकडील सपोनि रोहित शिंदे, पोउपनि मोहमद शेख, विवेक माने, सचिन देशमाने यांनी बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button