मिना बाजार व्यापारी संघाची नवी कार्यकारिणी जाहीर; १० मार्चपासून मिना बाजारास प्रारंभ

सोलापूर
रमजान सणानिमित्त दरवर्षी विजापूर वेस परिसरात भरविण्यात येणाऱ्या पारंपरिक ‘मिना बाजार’च्या आयोजनासाठी मिना बाजार व्यापारी संघाची नवी कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. संघाच्या अध्यक्षपदी कलीम तुलजापूरे यांची एकमताने निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी जाकीर नाईकवाडी व राजा सिंधगीकर, तर जनरल सेक्रेटरीपदी अशफाक (मेंबर) बागवान यांची निवड झाली आहे.
गेल्या सुमारे ७० ते ७५ वर्षांपासून सोलापूर शहरातील विजापूर वेस परिसरात रमजान महिन्यात मिना बाजार भरविण्याची परंपरा आहे. रमजान सणानिमित्त या बाजारात विविध प्रकारची दुकाने थाटली जातात. विशेषतः शिरखुर्म्यासाठी लागणारा मेवा, कपडे, महिलांसाठी सौंदर्य प्रसाधने, धार्मिक ग्रंथ, लहान मुलांचे कपडे, चप्पल, अत्तर, फळे तसेच रमजानसाठी आवश्यक विविध वस्तू येथे उपलब्ध असतात. या बाजारात सुमारे ५०० ते ७०० स्टॉल उभारले जात असून त्याचे नियोजन व देखरेख मिना बाजार व्यापारी संघाच्या वतीने केली जाते.
संघाचे माजी अध्यक्ष राजू कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत सन २०२६-२७ सालासाठी कलीम तुलजापूरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी इतर पदाधिकाऱ्यांमध्ये खजिनदारपदी मुस्ताक नझम रंगरेज, कार्याध्यक्षपदी शकील मोलेली, तसेच प्रमुख सल्लागार म्हणून हाजी मेहबूब शेख, हाजी मुनाफ चौधरी, इसाक सय्यद, हाजी तौफिक हुजरे, जुबेर बागवान, महमदसाब सौदागर यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून मंजूर (मामा) बागवान, राजू कुरेशी, इम्रान सालार, वसीम सालार, याकूब (सर) अत्तर शेख आदींचा समावेश आहे. तसेच नूतन सदस्य म्हणून आरिफ (बाबा) सालार व आसिफ अजीज शेख यांची निवड करण्यात आली आहे.
यंदाचा मिना बाजार मंगळवार दि. १० मार्च २०२६ पासून भरविण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष कलीम तुलजापूरे व जनरल सेक्रेटरी अशफाक बागवान यांनी दिली. या बाजारासाठी सोलापूर महानगरपालिका, राज्य वीज मंडळ आणि पोलिस प्रशासन यांचे दरवर्षीप्रमाणे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मिना बाजार परिसरात कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेने परवानगीशिवाय बॅनर अथवा डिजिटल बोर्ड लावू नयेत, असे आवाहन व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आले आहे. या संदर्भात पोलिस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहितीही संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.



