जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन : आईशक्ती फाउंडेशनकडून २४ शाळांमधील ७५० अनाथ मुलींना दिवाळीचे कपडे आणि फराळ…
विद्यार्थिनी हे देशाचे भविष्य

सोलापूर : प्रतिनिधी
विद्यार्थिनींच्या विशेषतः गरजू विद्यार्थिनींच्या पाठीशी शिक्षण आणि त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उभे राहणे आवश्यक आहे. विद्यार्थिनी देशाचे भविष्य आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले. आईशक्ती फाउंडेशनकडून बुधवारी शहरातील विविध २४ शाळांमधील एक हजार ९०० अनाथ आणि एकल पालक असलेल्या मुलींना दिवाळीचे कपडे आणि फराळ जिल्हाधिकारी एस. कार्तिकीयन यांच्या हस्ते देण्यात आला. कुचन शाळेच्या प्रांगणात हा हृदयस्पर्शी कार्यक्रम झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जयेश पटेल, डॉ. सिद्धांत गांधी, डॉ. रुची गांधी, रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अध्यक्ष संजीव पाटील, डॉ. अग्रजा चिटणीस – वरेकर, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दशरथ गोप, उज्वला शिरूर, आईशक्ती फाउंडेशनचे संस्थापक मोहन डांगरे, अध्यक्षा सृष्टी डांगरे उपस्थित होते. प्रारंभी व्याहर्ती होम करण्यात आला.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन म्हणाले, यंदाच्यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिवाळी साजरी करता येणार नाही. परंतु समाजातील गरजूंना दिवाळीच्या निमित्ताने आपल्या परीने प्रत्येकाने सहाय्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले.
आईशक्ती फाउंडेशनचे संस्थापक मोहन डांगरे म्हणाले, आईशक्ती फाउंडेशनकडून वर्षभर समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात. यात विशेषतः महिला आणि विद्यार्थिनींच्या प्रगतीचे ध्येय समोर ठेवून कार्यक्रमांची आखणी केली जाते. समाजातील स्त्रीशक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आईशक्ती फाउंडेशनचे ध्येय आहे, असेही मोहन डांगरे यांनी सांगितले.
आईशक्ती फाउंडेशनचे संस्थापक मोहन डांगरे यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक पंचाक्षरी स्वामी यांनी सूत्रसंचालन तर मुख्याध्यापक युवराज मेटे यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
अविनाश शंकू, लक्ष्मीकांत येलदि, व्यंकटेश बंडा यांनी परिश्रम घेतले.
——
चौकट
गरजू अनाथ मुलींच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी
समाजातील गरजू आणि अनाथ मुलींना उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा पुरवून त्यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी रयत शिक्षण संस्था घेईल, असे आश्वासन रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अध्यक्ष संजीव पाटील यांनी याप्रसंगी दिले.



