आमदार म्हणून कायमच देव देश धर्माचे काम करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार
आ. देवेंद्र कोठे : समाधान नगर येथील विकासकामांचा शुभारंभ

२५ लाखांचा निधी मंजूर करून आमदार देवेंद्र कोठे यांनी केली २५ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सोडवण्याची वचनपूर्ती
सोलापूर : प्रतिनिधी
समाधान नगर आणि परिसरातील देव देश धर्माचे काम करणाऱ्या मतदारांचा भारतीय जनता पार्टीच्या सर्व निवडणुकांच्या विजयात मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे आमदार म्हणून कायमच देव देश धर्माचे काम करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.
अक्कलकोट रस्ता येथील प्रभाग क्रमांक ११ मधील समाधान नगर येथे आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या २५ लाख रुपयांच्या विकासनिधीतून हनुमान मंदिरासमोरील सभा मंडप आणि संरक्षक भिंत बांधण्याचा कामाचा शुभारंभ आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. यावेळी नगरसेवक युवराज सरवदे, शारदा रामपुरे, मीनाक्षी कडगंची, अजय पोन्नम यांची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या तब्बल २५ वर्षांपासून समाधान नगर आणि परिसरातील नागरिकांची असलेली मागणी सोडवण्याचा शब्द आमदार देवेंद्र कोठे यांनी ‘आमदार आपल्या भेटीला’ या उपक्रमातून दिला होता. दिलेल्या या शब्दाची वचनपूर्ती करत आमदार देवेंद्र कोठे यांनी उर्वरित विकासकामेही युद्ध पातळीवरती करण्याची ग्वाही नागरिकांना दिली.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, विडी घरकुल प्रमाणे समाधान नगर आणि परिसराचाही विकास करण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. देव, देश, धर्म हितासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या मतदारांचा शब्द खाली पडू देणार नाही. एखाद्या आमदाराला संपूर्ण मतदारसंघासाठी जितका निधी मिळतो त्याहीपेक्षा जास्त म्हणजे १० कोटी रुपयांचा निधी प्रभाग क्रमांक ११ ला गेल्या दोन वर्षांत मंजूर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भक्कम साथ असल्याने सोलापूर शहराच्या विकासाला मुबलक निधी मिळत आहे. आगामी काळात देखील अधिक जबाबदारीने समाधान नगरसह संपूर्ण शहर मध्य विधानसभेच्या विकासाकरिता प्रयत्नरत राहणार आहे.

पूर्वीच्या लोकप्रतिनिधींकडून हद्दवाढ भागातील नागरिकांसोबत विकासनिधीबाबत जाणीवपूर्वक दुजाभाव करण्यात आला आहे. ही कसर भरून काढून समाधान नगरसह शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील आवश्यकता असलेल्या प्रभागांना दरवर्षी पाच कोटी रुपयांचा विकासनिधी देणार आहे, अशी ग्वाहीदेखील शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली.

याप्रसंगी महिला मोर्चाच्या संगीता खंदारे, अंजली माशाळकर, रामदास मगर रोहित हंचाटे, प्रशांत कदम, प्रभाकर झंपले, संगप्पा बबलाद, संजय पाटील, राजशेखर गुंड, लखन चव्हाण, अमोल उपाडे, महेश पवार, शिवराम माने, अक्षय शिवरे, शिवा गवळी, सूर्यकांत देवकर, भिमाशंकर उपाडे, बालाजी माने, यशराज गिडवीरे, शुभम कदम, विठ्ठल कोळी, अमर सावंत, ओंकार शिंदे, मनोज गिडवीरे, लिंगेश्वर लोणी, शशिकांत बागलकोटे, व्यंकट शिंदे, संगप्पा नंदी, बसवराज शिंपी, प्रसाद शिंदे, बाळाजी मोहिते, लता बंडा, बसवराज चडचण, प्रवीण सरवदे, सुनील जाधव, संतोष प्याटी, शिवा कोळी, प्रवीण गुंड, पार्वतीबाई बिराजदार, अमृता गवळी, वनिता माने, शरणाबाई कोळी, पूजा गुंड आदी उपस्थित होते.
——–
चौकट
शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी कटीबद्ध
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामुळे सोलापूर शहराला पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने ज्या ठिकाणी पाच दिवसात पाणी येते त्या ठिकाणी तीन दिवसाआड, ज्या ठिकाणी तीन दिवसात पाणी येते तिथे एक दिवसाआड आणि आगामी दोन ते तीन वर्षांच्या आत संपूर्ण शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, असे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून आमदार श्री. कोठे यांना प्रतिसाद दिला.



