‘द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’च्या पुढाकाराने सोलापुरात अवयवदान चळवळीत घडणार नवी क्रांती; एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न…
सोलापुरात अवयवदान व देहदान जनजागृतीसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न; अवयवदान चळवळीत नवी क्रांती घडवण्याचा निर्धार

सोलापूर
‘द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’, मुंबई आणि ‘यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात ‘ऑर्गन डोनेशन फॅसिलिटेटर वर्कशॉप’ (अवयवदान समन्वयक कार्यशाळा) १ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन ‘आयएमए’ (IMA) महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी व यशोधरा हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. बसवराज कोलूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. या कार्यशाळेतील अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यासाठी नाशिक, कल्याण, अहिल्यानगर अशा दूरच्या भागांसह संपूर्ण महाराष्ट्रातून अवयवदान व देहदान चळवळीत सक्रिय योगदान देणाऱ्या ६० हून अधिक निवडक सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.
उद्घाटनप्रसंगी विचार मांडताना डॉ. संतोष कुलकर्णी व डॉ. बसवराज कोलूर म्हणाले की, समाजात अवयवदान, देहदान आणि नेत्रदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि समर्पित समाजसेवकांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. आरोग्य व्यवस्था आणि समाज यांच्यातील दुवा म्हणून कार्यकर्त्यांनी कार्य करणे काळाची गरज आहे.
कार्यशाळेतील विविध सत्रांमध्ये राज्यभरातील नामवंत तज्ज्ञांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. कोल्हापूर (कागल) येथील डॉ. रोझारिओ डिसोझा यांनी देहदानाची निकड, कायदेशीर बाबी आणि समाजातील पारंपरिक मानसिकता यावर विस्तृत विचार मांडले. सांगलीचे ख्यातनाम नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन यांनी नेत्रदान आणि त्वचादानाची शास्त्रीय प्रक्रिया व कार्यकर्त्यांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.
केंद्र सरकारच्या ‘रोटो’ (ROTO) अंतर्गत मुंबईतील के.ई.एम. हॉस्पिटल कार्यालयाच्या प्रतिनिधी डॉ. कामाक्षी भाटे यांनी भारतातील अवयवदान कायद्यांची सविस्तर माहिती दिली. फेडरेशनचे उपाध्यक्ष श्री. सुनील देशपांडे यांनी अवयवदानाबाबत समाजात असलेल्या विविध धार्मिक गैरसमजुती व अंधश्रद्धांचे खंडन केले, तसेच जनजागृती करताना लोकांच्या मनातील प्रश्नांना शास्त्रोक्त उत्तरे कशी द्यावीत हे स्पष्ट केले. यशोधरा हॉस्पिटलचे डॉ. विजय शिवपुजे यांनी सोलापूर जिल्ह्यातील अवयवदानाची वस्तुस्थिती व आकडेवारी मांडत सामाजिक संस्थांनी या कार्यात गती आणण्याचे आवाहन केले.
फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम पवार यांनी स्वानुभवाची उदाहरणे देत कार्यकर्त्यांना समुपदेशन कलेचे तंत्र समजावले. कुटुंबावर ओढवलेला दुःखाचा प्रसंग अत्यंत संवेदनशील असतो, अशा वेळी कार्यकर्त्यांची देहबोली, संवादातील आत्मीयता आणि योग्य समुपदेशन सुरुवातीला आलेल्या नकारालाही होकारात बदलू शकते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यशाळेत सोलापूर जिल्हा समन्वयक (डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर) पदी श्री. योगिन गुर्जर यांची, तर सह-जिल्हा समन्वयक (जॉइंट डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर) पदी सौ. पद्मजा माने यांची नियुक्ती करण्यात आली.
सोलापुरात देहदान चळवळीचा पाया रचणाऱ्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. विकासभाई शहा यांनी प्रत्यक्ष कार्यात येणाऱ्या अडचणींविषयी अनेक प्रश्न उपस्थित करून तज्ज्ञांकडून शंकांचे निरसन करून घेतले, तसेच आगामी काळात फेडरेशनला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यशाळेत ८१ वर्षीय ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. नाना दुमालदार यांची पूर्णवेळ उपस्थिती विशेष लक्षवेधी आणि प्रेरणादायी ठरली. या वेळी यशोधरा हॉस्पिटलमधील अनेक डॉक्टर्स व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फेडरेशनचे सचिव श्री. प्रशांत पागनीस यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. दीपक पापडेजा यांनी केले. नवनियुक्त जिल्हा समन्वयक श्री. योगिन गुर्जर यांनी उपस्थितांचे आभार मानताना, “फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली सौ. पद्मजा माने यांच्या सहकार्याने सोलापूर जिल्ह्यात नव्या उत्साहाने कार्य करून अवयवदानाच्या क्षेत्रात ऐतिहासिक क्रांती घडवून आणू,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.



