घरफोडी चोरीचा गुन्हा उघड; अकलूज पोलिसांकडून सराईत आरोपी जेरबंद…
सुमारे ७.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त; अनेक गुन्ह्यांची कबुली

अकलूज
अकलूज पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत अकलूज पोलिसांनी सराईत आरोपीला अटक करून त्याच्याकडून सुमारे ७ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अकलूज पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी विशेष पथक तयार करून संशयितांचा शोध सुरू केला होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सचिन उर्फ भिमण मच्छिंद्र मोरे (वय २०, रा. माळशिरस, जि. सोलापूर) याला ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत आरोपीने घरफोडी केल्याची कबुली दिली.
आरोपीकडून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू असा एकूण सुमारे ७ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, तपासात आरोपीवर यापूर्वीही अकलूज व माळशिरस पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तो सराईत घरफोड्या असल्याचे समोर आले आहे.
ही दमदार कामगिरी पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा, सोलापुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक विजय गोसावी, निमगोंडा पाटील व पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, पोलीस हवालदार सलीम बागवान, हरिदास पांढरे, विरेश कलशेट्टी, पोकों बाळराजे घाडगे, अन्दर अत्तार, राहुल बोरकर, हरीष थोरात, वाहनचालक सुनिल पवार, अशोक हलसंगी व मपोह दिपाली जाधव, अश्विनी गोटे यांनी यशस्वीपणे पार पाडली…



