अजित पवार यांच्या मृत्यूचे राजकारण करण्यापेक्षा रोहित पवारांनी आजोबांचा आदर्श घेऊन सुसंस्कृत राजकारण करावे
आमदार देवेंद्र कोठे यांचा रोहित पवार यांना सल्ला...

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूचे राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजण्यापेक्षा आमदार रोहित पवार यांनी आपले आजोबा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या राजकारणाचा आदर्श घेऊन सुसंस्कृत राजकारण करावे, असा सल्ला आमदार देवेंद्र कोठे यांनी आमदार रोहित पवार यांना दिला.
आमदार रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आरोपींना सत्तेचा वापर करून वाचवले जात आहे, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केल्यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर मंगळवारी जोरदार राजकीय प्रहार करत त्यांना चांगलेच झोडपून काढले.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, रोहित पवार म्हणजे महाराष्ट्र राज्याचे राहुल गांधी आहेत. त्यांना विरोधी पक्षाचे नेतृत्व करण्याची इच्छा आहे. मध्यंतरीच्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आदित्य ठाकरे यांना मंत्रीपद मिळाले. परंतु रोहित पवारांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी ते द्वेषापोटी आजोबा शरद पवार आणि काका अजित पवार यांच्या भूमिकेच्या विसंगत भूमिका घेतात. स्वतःच्या महत्त्वाकांक्षेला बळ देण्यासाठी ते स्वतःच्याच पक्षाच्या विरोधातील भूमिका घेत आहेत.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गेल्या १० वर्षांत अनेक विकासकामे सुरू आहेत. हे महाराष्ट्राने आणि संपूर्ण देशाने पाहिले आहे. जगातील सर्वोत्कृष्ट चांगले काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी एक अशी त्यांची प्रतिमा बनलेली आहे. सगळ्याच पक्षाचे नेते आदराने त्यांच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करत असताना रोहित पवार मात्र राजकीय सूडबुद्धीने खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. वांझोटी चर्चा करत पत्रकार परिषदेची स्टंटबाजी करणे, दोन – चार पीपीटी सादर करणे आणि स्वतःला मोठे भासवण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार आमदार रोहित पवार प्रसिद्धीच्या झोतात येण्याच्या घाईमुळे करत आहेत. त्यांच्याकडे जर सबळ पुरावा असता तर त्यांनी गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. परंतु केवळ स्वतःचा टीआरपी वाढवून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमदार रोहित पवार आरोप करत आहेत, असा घणाघात आमदार देवेंद्र कोठे यांनी केला.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे शब्दाला जागणारे नेतृत्व होते. “शरद पवार यांनी शब्द दिला होता. तो मी बदलणार नाही” असे म्हणून त्यांनी पहाटेचा शपथविधी केला आणि नंतरच्या काळात देखील अजित पवार सरकारमध्ये समाविष्ट होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करत होते. आमदार रोहित पवार यांनी मात्र तेव्हा आणि आताही विरोधात भूमिका घेणे सुरू ठेवले आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे हे एक भूमिका मांडत असताना आमदार रोहित पवार मात्र स्वतःची स्वतंत्र चूल मांडण्याची धडपड करत आहेत, असे आमदार श्री. कोठे म्हणाले.
आमदार रोहित पवार यांनी गल्ली ते दिल्ली अशा कोणत्याही विषयात लुडबुड करण्याची भूमिका सोडली पाहिजे. त्याऐवजी त्यांनी आजोबा शरद पवार यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श घ्यावा. तो त्यांना वैयक्तिक फायद्याचा ठरेल, असा सल्लाही आमदार देवेंद्र कोठे यांनी दिला. अदानी आणि अंबानी परिवारावर मोठमोठी टीका करायची. पण ते बारामतीला आले की त्यांची गाडी चालवून त्यांची हुजरेगिरी करायची, असा दुतोंडीपणा आमदार रोहित पवार यांनी थांबवला पाहिजे, अशी टीकाही आमदार देवेंद्र कोठे यांनी केली.
मतदारसंघातील विकासकामांवर लक्ष देणे, पक्षाचे आमदार आपल्या सोबतच आहेत का हे पाहणे, स्वपक्षातील किती आमदारांना आपण त्यांचे वाटतो यावर आत्मचिंतन करणे आमदार रोहित पवार यांच्यासाठी गरजेचे आहे. महाराष्ट्र धर्माची आठवण करून देणारे रोहित पवार यांनी महाराष्ट्र धर्मात सांगण्यात आलेले सुसंस्कृत राजकारण सांभाळले पाहिजे. रोहित पवार यांचे जितके वय आहे तितका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समाजकारण आणि राजकारणातील अनुभव आहे. सलग पाच वर्षे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. आताही त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी करणारे सरकार काम करत आहे. पक्ष कोणताही असो आपण चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, हा संस्कार त्यांचे आजोबा शरद पवार यांनी रोहित पवार यांना दिला आहे परंतु आमदार रोहित पवार मात्र सोयीने सरड्याप्रमाणे भूमिका बदलतात. आमदार रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूचे राजकारण करू नये. ती दुःखद घटना होती. गेलेली व्यक्ती परत येणार नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी करणे हे महाराष्ट्रातील नागरिकांना वेदना देणारे आहे, असेही आमदार देवेंद्र कोठे म्हणाले.



