सत्संग, प्रवचनाच्या माध्यमातून नवी पिढी संस्कारित होण्यास सभा मंडप ठरतील सहाय्यभूत
आमदार देवेंद्र कोठे : श्री ओम शिवलिंग देवस्थान परिसरात सभा मंडप कामाचे भूमिपूजन

सोलापूर : प्रतिनिधी
सत्संग, प्रवचन या माध्यमातून नागरिकांची अध्यात्मिक सोय व्हावी याकरिता शहर मध्य विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी सभामंडपांना निधी देण्यात येत आहे. असे सभामंडप नवी पिढी संस्कारित करण्यास सहाय्यभूत ठरतील, असा विश्वास आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक नऊमधील दत्तनगर गिरी झोपडपट्टी येथील श्री ओम शिवलिंग देवस्थान येथे मंदिरालगत सभा मंडप बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते झाला. आमदार देवेंद्र कोठे यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून या सभामंडपासाठी तब्बल २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.

या सभामंडप भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर भाजपचे माजी शहर अध्यक्ष रामचंद्र जन्नू, नगरसेवक मेघनाथ येमूल, नगरसेविका पूजा वाडेकर, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगरसेवक विजय चिप्पा, माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, नागनाथ सोमा, अंबादास बिंगी, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, शिक्षक आघाडीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, श्रीकांत वाडेकर आदी उपस्थित होते.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, पूर्वीच्या आमदारांनी शहर मध्य मतदारसंघातील हिंदूबहुल भागांच्या विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार हिंदू देवस्थानच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली.

शहर मध्य विधानसभा मतदारसंघात देव देश धर्म हिताचा विचार करून हिंदू देवस्थानाच्या विकासासाठी प्राधान्याने निधी देण्याचे काम सुरू आहे. श्री वेंकटेश्वर देवस्थान परिसरातील रस्ते विकास, पूर्व विभागातील श्रीराम मंदिरासाठी १ कोटी रुपयांचा निधी, तसेच अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या डॉ. हेडगेवार पटांगणाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
प्रभाग क्रमांक नऊ मध्ये वर्षभराच्या आतच ३ कोटी ५० लाख रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत. आगामी काळातही नागरिकांनी सुचविलेल्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. रस्ता, ड्रेनेज, पाणी व्यतिरिक्त क्रीडांगणे, उद्याने याकरिताही निधी देण्यात येणार आहे, असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी सांगितले. माझ्या आमदारकीला दोन वर्षे झाली आहेत. आगामी काळात शहर मध्य विधानसभा मतदारसंघात खूप मोठे विकासात्मक बदल दिसून येतील, असेही आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले.

यावेळी आ. देवेंद्र कोठे यांनी भाजपा सोलापूर शहर शिक्षक आघाडीचे प्रमुख तथा प्रसिद्ध पायोनियर क्लासेसचे संचालक दत्ता पाटील यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी मधुकर बंडा, राम गड्डम, अनिल वंगारी, मेघा इटम, श्रीराम गडगी, राजू देवसानी, बालराज श्रीगादी, उमाशंकर कामुनी, श्रीनिवास गुंडेटी, नागेश चिल्हाळ, बालाजी बोडा, गोवर्धन गडगी, राजू येलदी, रमेश कोंडा, सतीश मिठा, नरेश चरकूपल्ली, प्रभाकर केंचगुंडी, नागमणी गडगी, कविता कनकी यांच्यासह परिसरातील माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि युवा सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——–
चौकट
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात स्वच्छतेला प्राधान्य
या कार्यक्रमात बोलताना माकपचे माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी यांनी दत्तनगर परिसरातील सार्वजनिक मुतारी हटविण्याची मागणी केली. नागरिकांनीही त्या मागणीला पाठिंबा दिला. त्यावर आमदार देवेंद्र कोठे यांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात झालेल्या स्वच्छतेच्या कामाचे दाखले दिले. आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, काँग्रेसची सत्ता असताना नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालये बांधावी लागत असत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून स्वच्छतेला प्राधान्य देत स्वच्छ भारत अभियान राबवून शौचालय बांधण्यासाठी १० हजार रुपयांचे अनुदान घरोघरी दिले. याचे अत्यंत सकारात्मक परिणाम सर्वत्र दिसत आहेत, असे आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले.



