बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण (दादा) गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”

सोलापूर
– ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा यांच्यातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा विधीभूषण पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वरळे व न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांच्या हस्ते योगी सभागृह, दादर येथे पार पडला. यावेळेला बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवाचे चेअरमन ॲड. जयंत जायभावे, उपाध्यक्ष ॲड. रंजना भोसले, सदय ॲड. मिलिंद थोबडे तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश गिरीश गोडबोले व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
पन्नास वर्ष वकिली पूर्ण झालेल्या वकिलांना विधिभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाने या वर्षा पासून सुरु केले. सबंध सोलापूर जिल्हातून ॲड.गोडबोले (दादा) यांची या पुरस्कारासाठी शिफारस ॲड. मिलिंद थोबडे यांनी केले, त्याप्रमाणे सर्वानुमते ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना विधीभूषण पुरस्कार देण्याचे ठरले गेले.
गोडबोले दादांना वयाच्या ९३ व्या वर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोडबोले दादांचा जन्म हा २४ सप्टेंबर १९३३ रोजी सोलापूर येथे झाला. वकिली व्यवसायातील तिसऱ्या पिढीचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. दादांनी वयाच्या ८८ व्या वर्षापर्यंत सक्रियपणे वकिली व्यवसाय केला. आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा, ज्ञानाचा लाभ ते आजही तरुण वकिलांना देतात. दादा हे सोलापूरच्या विधि क्षेत्रातील एक चालते बोलते विद्यापीठच आहेत. त्यांचे संपूर्ण जीवन प्रामाणिकपणा, व्यावसायिक निष्ठा कठोर परिश्रम आणि कायदे व्यवसायाप्रती असलेली अढळ श्रद्धा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ॲड गोडबोले दादा. त्यांचे चिरंजीवच म्हणजे उच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश गिरीश गोडबोले.
दादांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.



