india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

महापालिकेच्या हिंगलाजमाता बॉईज हॉस्पिटल येथे १५० खाटांचे सुपर स्पेशालिटी धर्मादाय रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव

जी. के. फाऊंडेशनच्या वतीने महापौरांच्या दालनात प्रकल्पाचे सादरीकरण; CSR निधीतून उभारणार अत्याधुनिक रुग्णालय..

 

सोलापूर

 

सोलापूर शहरासह परिसरातील गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचार मोफत अथवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जी. के. फाऊंडेशन, पुणे यांच्या वतीने १५० खाटांचे सुपर स्पेशालिटी धर्मादाय रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेसमोर मांडण्यात आला. यासंदर्भात महापौर यांच्या कार्यालयात महापौर श्री. विनायक रामकृष्ण कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले.यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, सभागृह नेते नरेंद्रजी काळे, स्थायी समिती सभापती रंजिताताई चाकोते, माझी महापौर श्रीकांचनाताई यन्नम, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणीताई तडवळकर, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, उद्यान सभापती राजशेखर पाटील, आरोग्य सभापती सुनील खटके, विधी समिती सभापती सत्यजित वाघमोडे, स्थापत्य समिती सभापती विजय चिप्पा, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, नगर अभियंता नीलकंठ मठपती यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

 

यावेळी जी. के. फाऊंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष श्री. गुंडाप्पा खडके आणि रुग्णालय प्रकल्प प्रमुख श्री. मकबूल तांबोळी यांनी प्रकल्पाची माहिती दिली. प्रस्तावित रुग्णालयात हृदयरोग, कर्करोग, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, अतिदक्षता विभाग (ICU), कॅथलॅब, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, केमोथेरपी, डायलिसिस तसेच अत्याधुनिक निदान सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

 

 

या प्रकल्पासाठी महानगरपालिकेमार्फत अंदाजे १८ हजार चौरस फूट जागा ३० वर्षांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. रुग्णालयाचे बांधकाम, वैद्यकीय उपकरणे, डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच संपूर्ण संचालनाचा खर्च जी. के. फाऊंडेशनमार्फत CSR निधी, कॉर्पोरेट सहकार्य आणि देणग्यांतून करण्यात येणार आहे. तसेच वीज व पाणी सुविधा महानगरपालिकेमार्फत मोफत उपलब्ध करून देण्याबाबतही प्रस्ताव मांडण्यात आला.

 

 

 

बैठकीत जागेची उपलब्धता, प्रशासकीय मान्यता आणि प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर सादर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाल्यास सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button