maharashtrapoliticalsocialsolapur

“बाळेच्या राजकारणात मोठा धमाका; राजाभाऊ आलुरे शुक्रवारी बांधणार शिवबंधन!

बाळेतील लोकप्रिय चेहरा शिवसेनेत; शुक्रवारी होणार मोठा पक्षप्रवेश

सोलापूर

 

बाळे परिसरातील पक्षाशी एकनिष्ठ, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलुरे हे येत्या शुक्रवारी शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आल्याने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असलेले तसेच आमदार विजयकुमार देशमुख यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे राजाभाऊ आलुरे यांच्या या निर्णयाकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे सोलापूर संपर्कप्रमुख धैर्यशील माने हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका आणि स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

राजाभाऊ आलुरे यांनी आपल्या विकासात्मक कार्यातून बाळे परिसरातील नागरिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सातत्याने लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढा देणारे नेतृत्व म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्यामुळे ते बाळेकरांच्या घरोघरी पोहोचले आहेत.

 

 

 

 

राजाभाऊ आलुरे यांची राजकीय कारकीर्द २०१२ साली आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. त्यांनी बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष, शहर उपाध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना सदस्य, ओम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे माजी अध्यक्ष अशी विविध जबाबदारीची पदे यशस्वीपणे सांभाळली आहेत.

सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणे, लोकाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण मोहिमा, बॉडी बिल्डिंग स्पर्धा, आरोग्य व नेत्ररोग तपासणी शिबिरे तसेच विविध सामाजिक मंडळांमध्ये सक्रिय सहभाग अशा अनेक उपक्रमांमधून त्यांनी समाजसेवेचा ठसा उमटवला आहे. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमाला आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

 

 

 

 

प्रभाग क्रमांक ५ मध्ये मागील दहा वर्षांत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करत ड्रेनेज, रस्ते, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी प्रभागात आणून विकासकामे मार्गी लावल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.

दरम्यान, २०२६ च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना ५,३६४ मते मिळाली होती. अल्प फरकाने त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी आपली स्वतंत्र राजकीय ताकद सिद्ध केली होती.

 

 

 

 

राजाभाऊ आलुरे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे बाळे परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त होत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाकडे विशेष लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button