ऑपरेशन समन्वयचा दणका; सोलापुरात अवैध मद्य अड्ड्यांवर छापे, २१ जण जेरबंद…

सोलापूर, दि. ४ जून :
पुणे येथे मिथेनॉल मिश्रित विषारी मद्यप्राशनामुळे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने संपूर्ण राज्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात “ऑपरेशन समन्वय” ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग, महसूल विभाग, ग्रामीण पोलीस व सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापक कारवाई करण्यात आली.
अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील हॉटेल, ढाबे, टपऱ्या तसेच हातभट्टी निर्मितीच्या ठिकाणांवर धडक कारवाई करण्यात आली. कवठे तांडा परिसरातील अवैध हातभट्ट्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. या मोहिमेत महिला पोलिस कर्मचाऱ्यांचाही सक्रिय सहभाग होता.

या विशेष मोहिमेदरम्यान शहरातील ७५ हून अधिक ठिकाणी भेटी देऊन जनजागृती करण्यात आली. अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात आली.
कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील विविध कलमान्वये ५ गुन्हे दाखल करण्यात आले असून २१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ३ आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या कारवाईत ३४६० लिटर रसायन, ८३० लिटर हातभट्टी दारू, ५.२२ बल्क लिटर विदेशी मद्य, ११.१२ बल्क लिटर देशी मद्य आणि १५.५ लिटर ताडी जप्त करण्यात आली. तसेच २२ लोखंडी ड्रम, २ लोखंडी बॅरल, २ लोखंडी बाकडे, १ कॉट ड्रम, २० लाकडी ड्रम व २० लाकडी बाकडे जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख ४४ हजार ४३२ रुपये इतकी आहे.
आता जिल्हाभर जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर
अवैध हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक, साठवणूक व विक्री रोखण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत संबंधितांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तसेच अवैध मद्य व्यवसायाशी संबंधित पूर्वइतिहास असलेल्या व्यक्ती, आरोपी, गूळ व्यापारी, ब्लॅक मार्केटर व संबंधित व्यावसायिकांची विशेष बैठक घेऊन त्यांना कायद्याची जाणीव करून देण्यात येणार आहे.
हातभट्टी निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकडाचा वापर होत असल्याने वन विभागाशी समन्वय साधून अवैध लाकूड पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच हातभट्ट्यांमध्ये आढळणाऱ्या अनधिकृत वीजजोडण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात आला असून अशा ठिकाणांचा वीजपुरवठा तात्काळ खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे.
हॉटेल, ढाबा चालकांना इशारा
जिल्ह्यातील सर्व हॉटेल, ढाबा चालक, व्यावसायिक, पर्यटकस्थळ चालक आणि जागामालकांना आपल्या आस्थापनांमध्ये कोणत्याही प्रकारची हातभट्टी दारू, बनावट मद्य, बेकायदेशीर मद्यविक्री अथवा मद्यसेवनास परवानगी देऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. अशा प्रकारचे प्रकार आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
नागरिकांना आवाहन
राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना केवळ अधिकृत आणि परवानाधारक मद्यविक्री केंद्रातूनच मद्य खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. बनावट अथवा अवैध मद्याचे सेवन केल्यास गंभीर आरोग्यविषयक परिणाम होऊन जीवितहानी होऊ शकते. मद्यसेवनासाठी आवश्यक असलेला परवाना (Permit) बाळगणे बंधनकारक असून परवान्याशिवाय मद्यसेवन किंवा मद्य बाळगणे हा दंडनीय अपराध असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारच्या शून्य सहनशीलता धोरणानुसार “ऑपरेशन समन्वय” अंतर्गत अवैध मद्यनिर्मिती व विक्रीविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचा इशारा अधीक्षक माया पी. जाधव यांनी दिला आहे.
तसेच नागरिकांना आपल्या परिसरात अवैध मद्यविक्री किंवा हातभट्टीबाबत माहिती मिळाल्यास ती मोबाईल क्रमांक ८४२२००२३३३ किंवा ९५००३३३३३९ वर कळविण्याचे आवाहन करण्यात आले असून माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.



