सराईत वाळू तस्कर महेश शिंदे याला एमपीडीए अंतर्गत एक वर्षासाठी तडीपार; येरवडा कारागृहात स्थानबद्ध…

पंढरपूर, दि. ४ जून २०२६ :
पंढरपूर शहर परिसरात अवैधरित्या वाळू उपसा करून त्याची विक्री करणारा तसेच विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला सराईत गुन्हेगार महेश तानाजी शिंदे (रा. इसबावी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टी व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार तसेच धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला एक वर्षासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उपसा व विक्री व्यवसाय करणारा महेश शिंदे हा वाळू चोरी, मारहाण, दहशत निर्माण करणे, जीवघेणे हल्ले करणे तसेच परिसरातील नागरिकांना धमकावणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याने समाजात भीतीचे वातावरण निर्माण केले होते.
यापूर्वीही विविध अवैध वाळू व्यवसाय आणि शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. मात्र जामिनावर सुटल्यानंतरही त्याने अवैध धंदे सुरूच ठेवले. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७७/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०५(ई) तसेच गौण खनिज कायद्यान्वये वाळू चोरीचा गुन्हा दाखल आहे.
त्याच्या वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विचार करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन यांनी मंजुरी दिल्यानंतर महेश शिंदे याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश पारित करण्यात आला.
या आदेशानुसार महेश शिंदे याला ताब्यात घेऊन येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पंढरपूर शहरातील वाळू तस्करी व इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारांविरोधात अशाच प्रकारच्या कठोर कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कवाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संजय जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



