सोलापुरातील खासगी रुग्णालयांमध्ये बोगस नर्सचा सुळसुळाट?; छावा संघटनेची कारवाईची मागणी

सोलापूर
शहर व जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रता व वैध नोंदणी नसलेल्या महिलांना नर्स म्हणून कामावर ठेवून रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. योगेश (दत्ता) पवार यांनी केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित रुग्णालयांची तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अॅड. पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्स म्हणून काम करण्यासाठी ANM, GNM, B.Sc. Nursing किंवा Post Basic B.Sc. Nursing यांसारखी मान्यताप्राप्त शैक्षणिक पात्रता तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक आहे. मात्र, अनेक खासगी रुग्णालयांमध्ये कोणतेही अधिकृत प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडून इंजेक्शन देणे, सलाईन लावणे, ड्रेसिंग करणे आणि औषधोपचाराशी संबंधित इतर जबाबदाऱ्या पार पाडल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कमी वेतनात कर्मचारी उपलब्ध होत असल्याने काही रुग्णालये प्रशिक्षित नर्सऐवजी अप्रशिक्षित महिलांना नोकरीवर ठेवत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. प्रशिक्षित नर्सला देण्यात येणाऱ्या वेतनाच्या तुलनेत कमी खर्चासाठी अशा नियुक्त्या केल्या जात असल्याने रुग्णांच्या आरोग्याशी गंभीर तडजोड होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे वैद्यकीय उपचारांमध्ये चुका होण्याची शक्यता वाढत असून रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्हाभरातील सर्व खासगी रुग्णालयांची विशेष तपासणी मोहीम राबवून नोंदणीविना काम करणाऱ्या व्यक्ती आणि त्यांना रोजगार देणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी छावा संघटनेने केली आहे.
अॅड. योगेश पवार यांनी प्रशासनाला 15 दिवसांचा अवधी दिला असून या कालावधीत चौकशी व कारवाईची प्रक्रिया सुरू न झाल्यास जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांसमोर जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. तसेच बोगस नर्स नियुक्त करणाऱ्या रुग्णालयांची माहिती जनतेसमोर आणि सोशल मीडियाद्वारे जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या गंभीर आरोपांमुळे खासगी आरोग्य व्यवस्थेतील कर्मचारी नियुक्ती प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.



