सोलापुरातील मदरशात 10 वर्षीय मुलीवरील कथित अत्याचारप्रकरणी मौलानाविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा; परिसरात संताप…

सोलापूर
सोलापूर शहरातील एका मदरशामध्ये धार्मिक शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या 10 वर्षीय मुलीशी कथित गैरवर्तन व अत्याचार केल्याच्या आरोपावरून 53 वर्षीय मौलानाविरुद्ध पॉक्सोसह विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,शहर परिसरातील एका मदरशात पीडित मुलगी धार्मिक शिक्षणासाठी जात होती. फिर्यादीनुसार,मदरशात शिक्षण देणारे आरोपी मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रजवी (वय 53,रा.सोलापूर) यांनी मागील काही काळापासून मुलीशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच इतर काही मुलींशीही अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे,तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम 8, 10, 12 आणि जेजे ॲक्ट 2015 च्या कलम 75 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून,धार्मिक संस्थांच्या नावाखाली अल्पवयीन मुलांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.
दरम्यान,या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत असून,तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. आरोपीवरील आरोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेनंतरच निश्चित होणार आहे.



