भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे “डिवाइन राजस्थान विथ उज्जैन यात्रा”
IRCTC कडून विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक टूर पॅकेज-11 रात्री / 12 दिवसांची विशेष यात्रा

27 मार्च रोजी सोलापूरहून प्रस्थान
भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ लिमिटेड (IRCTC), हे रेल्वे मंत्रालय, भारत सरकारच्या अधिपत्याखालील नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असून, त्यांनी “भारत गौरव पर्यटक ट्रेन” द्वारे “डिवाइन राजस्थान विथ उज्जैन यात्रा” हा विशेष आध्यात्मिक आणि सांस्कृतिक टूर पॅकेज जाहीर केला आहे. ही 11 रात्री आणि 12 दिवसांची यात्रा प्रवाशांना राजस्थानच्या राजेशाही वारशाचा आणि उज्जैनच्या आध्यात्मिकतेचा अनोखा अनुभव देणार आहे.
भारत सरकारच्या “देखो अपना देश” आणि “एक भारत श्रेष्ठ भारत” या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी IRCTC ही विशेष पर्यटन यात्रा आयोजित करत आहे. या उपक्रमाचा उद्देश देशाची समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
IRCTC पश्चिम विभाग (मुंबई) चे ग्रुप जनरल मॅनेजर श्री गौरव झा यांनी या यात्रेबाबत माहिती देताना सांगितले की ही विशेष पर्यटक ट्रेन 27 मार्च रोजी सोलापूर येथून प्रस्थान करणार आहे. या यात्रेसाठी प्रवाशांना पुणे, लोणावळा, कल्याण, वसई रोड आणि सूरत या प्रमुख स्थानकांवरून ट्रेनमध्ये चढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या यात्रेदरम्यान प्रवाशांना उदयपूरच्या सुंदर तलावांचे दर्शन, नाथद्वारा येथे श्रीनाथजींचे दर्शन, पुष्करचे पवित्र तीर्थ, जोधपूर आणि जयपूरचे ऐतिहासिक किल्ले व राजवाडे, खाटू श्यामजी मंदिराचे दर्शन तसेच उज्जैन येथील भगवान महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. ही यात्रा धार्मिक अनुभवासोबतच राजस्थानच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा परिचय करून देणारी ठरेल.
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि बजेटचा विचार करून या ट्रेनमध्ये तीन प्रकारच्या श्रेणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत—
इकॉनॉमी क्लास (स्लीपर) – ₹19,900 प्रति व्यक्ती
स्टँडर्ड क्लास (3 एसी) – ₹31,920 प्रति व्यक्ती
कम्फर्ट क्लास (2 एसी) – ₹41,840 प्रति व्यक्ती
सुमारे 750 प्रवाशांची क्षमता असलेल्या या विशेष ट्रेनमध्ये सोलापूर, पुणे, कल्याण, वसई रोड आणि सूरत या प्रमुख स्थानकांवर चढणे आणि उतरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
IRCTC पश्चिम विभाग, मुंबईचे जनसंपर्क अधिकारी डॉ. ए. के. सिंह यांनी सांगितले की प्रवाशांच्या सोयीसाठी ही यात्रा “ऑल-इन्क्लुसिव्ह पॅकेज” स्वरूपात तयार करण्यात आली आहे. या पॅकेजमध्ये रेल्वे प्रवास, शुद्ध शाकाहारी भोजन, हॉटेलमधील निवास व्यवस्था, स्थानिक पर्यटनासाठी बस सेवा, टूर एस्कॉर्ट तसेच प्रवाशांसाठी प्रवास विमा यांचा समावेश आहे, ज्यामुळे प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि संस्मरणीय प्रवासाचा अनुभव मिळेल.
या यात्रेबाबत अधिक माहिती आणि बुकिंगसाठी इच्छुक प्रवाशांनी IRCTC च्या अधिकृत पर्यटन संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा जवळच्या IRCTC पर्यटन कार्यालयाशी संपर्क साधावा.



