गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी; बेपत्ता 10 वर्षीय मुलगी अवघ्या 7 तासांत नातेवाईकांच्या स्वाधीन
रस्ता चुकलेल्या चिमुरडीला गुन्हे शाखेने सुरक्षितपणे नातेवाईकांच्या केले स्वाधीन...

सोलापूर
दि. 30 मे 2026 : सोलापूर शहर गुन्हे शाखेने तत्परता दाखवत बेपत्ता झालेल्या 10 वर्षीय मुलीचा अवघ्या सात तासांत शोध घेऊन तिला सुरक्षितपणे तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे.
अर्पिता मल्लिकार्जुन बागले (वय 10, मूळ रा. माळकवठे, ता. दक्षिण सोलापूर) ही मुलगी सध्या सोलापूर येथील बसवनगर, भवानी पेठ परिसरात आपल्या नातेवाईकांकडे राहत होती. दिनांक 29 मे 2026 रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ती घराबाहेर गेल्यानंतर बेपत्ता झाली. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 137(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील तसेच सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मुलीचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. तपासादरम्यान मुलगी कुमठा नाका, मंगळवार पेठ, टिळक चौक मार्गे अश्विनी हॉस्पिटलकडे गेल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू ठेवली.
दरम्यान, मुलगी अश्विनी हॉस्पिटल ते रिमांड होम परिसरात दिसल्याची माहिती पोलीस अंमलदार संजय साळुंखे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत शोधकार्य सुरू केले. अखेर अर्पिता ही मुलगी सुरक्षित अवस्थेत आढळून आली.
पोलिसांनी मुलीकडे चौकशी केली असता ती रस्ता चुकल्याने घराचा शोध घेत फिरत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिची ओळख पटवून नातेवाईकांच्या उपस्थितीत तिची सुखरूपपणे त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजन माने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड तसेच नंदराम गायकवाड, अंकुश भोसले, वाजिद पटेल, योगेश बर्डे, महेश शिंदे, शैलेश बुगाडे, संजय साळुंखे, अभिजय माने, अमितीत धायगुडे, काशिनाथ वाघे, भारत पाटील, सिद्धाराम देशमुख, धीरज सातपुते, सुभाष मुंडे, चालक बाळासाहेब काळे व श्याम सुरवसे यांनी पार पाडली.



