राजमाता अहिल्यादेवींचा विचारवारसा शिखर पहारीया फाउंडेशनने जपला : डॉ. शिंदे
शिखर पहारिया फाउंडेशनतर्फे शिलाई मशीन , सायकलचे वाटप

सोलापूर :
भूक लागल्यावर जेवणं ही प्रकृती, भूक नसताना जेवणं ही विकृती, पण आपल्याकडे असलेल्या शिदोरीतील काही भाग समोरच्या गरजूला देणं ही आपली संस्कृती आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आयुष्यभर प्रजेचे हित हेच आपले अंतिम ध्येय मानले. त्यांचा विचारवारसा शिखर पहारिया फाउंडेशनने पुढे जपला आहे, असे गौरोद्गार पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी काढले.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ जयंतीनिमित्त शिखर पाहारिया फाउंडेशनच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत सायंकाळी ऐश्वर्या बँक्वेट हॉल येथे गरजू व निराधार महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी १० शिलाई मशीनचे वाटप, अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी १० विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक विनोद मोटे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, फाउंडेशनचे धर्मराज गुंडे , तनवीर शेख, राज सलगर, कौशल शिंदे, विजयराज जमदाडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सायकल आणि शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
डॉ. शिवाजी शिंदे पुढे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य अजरामर आहे. अहिल्यादेवींनी आयुष्यभर प्रजेचे हित हेच आपले अंतिम ध्येय मानले. स्वतःच्या आयुष्यात अनेक दुःखांचे डोंगर पेलूनही त्यांनी जनतेसाठी अन्नछत्रे, विहिरी आणि मंदिरांची उभारणी केली. आज त्यांच्याच नावाने सोलापूर विद्यापीठ ओळखले जाते, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या विचारांचा वारसा आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. यावेळी विक्रम खेलबुडे यांनी आपल्या भाषणात शिखर पहारीया फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला.
प्रारंभी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यापूर्वीही या फाउंडेशनच्या वतीने मुलांचे पालकत्व स्वीकारणे, अनाथाश्रमांना मदत करणे, जनरेटरची सोय करणे आणि सुमारे ५ हजार अन्नधान्य किट्सचे वाटप करणे यांसारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले गेले आहेत. समाजातील वंचित व दुर्बल घटकांना शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून सक्षम करण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे धर्मराज गुंडे यांनी प्रस्ताविकात सांगितले.
—



