शहर विकासासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा समन्वय; खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे यांची महापालिकेत विशेष आढावा बैठक

सोलापूर
सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाला अधिक वेग देण्यासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचे प्रभावीपणे निराकरण करण्याच्या उद्देशाने राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी आज सोलापूर महानगरपालिकेत विशेष आढावा बैठक घेतली. महानगरपालिका आयुक्तांसह विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत शहराच्या विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात अधिक सक्षम समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बैठकीत शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक सुविधा, पायाभूत विकास तसेच केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला नागरिकांच्या दैनंदिन अडचणी तातडीने सोडविण्यासाठी प्रत्येक विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे निर्देश खासदार डॉ. वाघमारे यांनी दिले. यावेळी बोलताना खासदार प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे म्हणाल्या, सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.

केंद्र शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ सोलापूरकरांना मिळावा, यासाठी प्रशासनाने गतिमान आणि समन्वयात्मक पद्धतीने काम करावे. शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठीही सातत्याने प्रयत्न केले जातील. नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क असून प्रशासनाने लोकाभिमुख कार्यपद्धती स्वीकारावी.

या बैठकीला महानगरपालिका आयुक्त सचिन ओम्बासे, उपायुक्त वीणा पवार, शिवसेनेचे गटनेते अमोल बापू शिंदे, नगरसेवक प्रियदर्शन साठे, नगर अभियंता अकुलवार मॅडम यांच्यासह महानगरपालिकेतील सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.



