india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी; वारकऱ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश

.

 

 

सोलापूर

सालाबादप्रमाणे आषाढी वारीनिमित्त श्री क्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचे शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी सोलापूर शहरात आगमन होणार असून पालखीचा शहरात दोन दिवस मुक्काम असणार आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधा आणि आवश्यक तयारीचा आढावा घेण्यात आला.या पाहणी दौऱ्यात स्थायी समिती सभापती सौ. रंजीता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त सौ. वीणा पवार, नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेवक गौतम कसबे, नगरसेवक रवी कयावले, नगरसेवक भरतसिंग बडूरवाले, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेविका कल्पना कदम,माजी नगरसेवक दिलीप कोल्हे,नगर अभियंता सारिका आकूलवार, अग्निशमन विभागाचे राकेश साळुंखे, अवचित दुधाळ, श्री गजानन महाराज शेगाव संस्थानचे स्थानिक प्रतिनिधी सुनील कुलकर्णी व सुनील फाळके, उद्यान अधिकारी कोमल काशीद तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.पाहणीची सुरुवात रूपाभवानी पाणी गिरणी चौक येथून करण्यात आली.

 

 

याच ठिकाणी श्री गजानन महाराजांच्या पालखीचे शहरात आगमन होणार आहे. त्यानंतर तुळजापूर वेस, कस्तुरबा मार्केट, सम्राट चौक, श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर, बाळी वेस, टेलिफोन भवन, कुंभार वेस, करण चौक मार्गे कुचन प्रशाला येथे पालखीच्या मुक्कामस्थळाची पाहणी करण्यात आली.यावेळी पालखी मार्गावरील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था, आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहन व्यवस्था, वाहतूक नियोजन, मुक्कामस्थळी वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तसेच इतर नागरी सोयी-सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.त्यानंतर वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी उपलब्ध असलेल्या मंगल कार्यालयांची पाहणी करण्यात आली.

 

 

पुढे मोदी रेल्वे ब्रिज ते दमाणी नगर या मार्गाचीही पाहणी करून आवश्यक कामांची नोंद घेण्यात आली.यावेळी महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी संबंधित विभागांना पालखी मार्गावरील सर्व अडथळे तात्काळ दूर करणे, झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करणे, रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजविणे, स्वच्छता अधिक प्रभावीपणे करणे, प्रकाश व्यवस्था सुरळीत ठेवणे तसेच वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.महापौर श्री. विनायक कोंड्याल म्हणाले :”श्री गजानन महाराज पालखी सोहळा हा सोलापूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. हजारो वारकरी शहरात येत असल्याने त्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने सर्व विभागांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्वच्छता, पाणी, आरोग्य, प्रकाश व्यवस्था, सुरक्षा आणि इतर सर्व सुविधा दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.

 

“महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे म्हणाले :”पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने सर्व विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, अग्निशमन, प्रकाश व्यवस्था, वाहतूक आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

 

 

पालखी मार्गावरील सर्व कामे वेळेत पूर्ण करून वारकऱ्यांना सुरक्षित व सुकर सेवा देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.”सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री गजानन महाराज पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात येत असून, पालखी सोहळा सुरळीत, सुरक्षित आणि भक्तिमय वातावरणात पार पडण्यासाठी सर्व विभाग समन्वयाने कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button