शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी; आंतरजिल्हा मोटारसायकल चोर जेरबंद, १४ गुन्हे उघड – ६.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : शहरात सातत्याने घडणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या घटनांचा छडा लावत सोलापूर शहर गुन्हे शाखेने आंतरजिल्हा मोटारसायकल चोराला अटक करून तब्बल १४ गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपीकडून ६ लाख ५५ हजार रुपयांच्या १४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, सोलापूर, धाराशिव, सातारा आणि कर्नाटकातील चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा शोध सुरू केला होता.
फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना १२ जुलै २०२६ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे हैदराबाद रोडवरील मार्केट यार्ड परिसरात सापळा रचून सत्यवान रामहरी भोसले (वय ३२, रा. पडसाळी, ता. उत्तर सोलापूर) याला चोरीच्या होंडा युनिकॉर्न मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपीने वसंत विहार परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरटीओ नोंदणी, इंजिन व चेसीस क्रमांकाची पडताळणी केल्यानंतर ती मोटारसायकल फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर सखोल चौकशीत आरोपीने सोलापूर, धाराशिव, सातारा तसेच कर्नाटक राज्यातून आणखी मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीजबाबावरून आणखी १३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
या कारवाईमुळे सोलापूर शहरातील ७, धाराशिव जिल्ह्यातील ५, सातारा जिल्ह्यातील १ आणि कर्नाटकातील १ असे एकूण १४ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, ६ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त प्रितम यावलकर, सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्यासह पोलीस अंमलदार विनोद रजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा भिंगारे, सुरज पवार, विजयकुमार वाळके, महेश रोकडे, शैलेश बुगड, महेश शिंदे, युवराज गायकवाड, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे तसेच सायबर पोलीस ठाण्यातील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी बजावली.



