आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांरोधात फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा

सोलापूर :
आई-वडिलांचा सांभाळ न करता त्यांना घराबाहेर काढून मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीवरून त्यांच्या दोन मुलांसह दोन सुनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदा रमेश शिंदे (वय 68, रा. जुनी मिल चाळ, मुरारजी पेठ, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी नमूद केले की, सन 2015 पासून त्यांच्या दोन मुलांनी व दोन सुनांनी त्यांचा सांभाळ न करता राहत्या घरातील जेवणापासूनही वंचित ठेवले. वारंवार शिवीगाळ करून घराबाहेर काढण्यात आले तसेच त्यांच्या नावावरील घराचा स्वतः वापर करून त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देण्यात आला.
याप्रकरणी अनिल रमेश शिंदे, अनुप रमेश शिंदे, संपूर्णा अनिल शिंदे आणि दीपाली अनुप शिंदे यांच्याविरुद्ध ज्येष्ठ नागरिक पालक पालनपोषण व त्यांचे देखभाल अधिनियम, 2007 च्या कलम 24 अन्वये फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांचे आवाहन
ज्येष्ठ नागरिकांचा छळ करणे, त्यांना घराबाहेर काढणे, पालनपोषण न करणे किंवा मानसिक व शारीरिक त्रास देणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारच्या घटना घडल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन फौजदार चावडी पोलिसांनी केले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (परिमंडळ) प्रताप नवलेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली…



