सोलापूरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
आमदार देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची भावना

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करावे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला दिले आहेत, अशी माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली. सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय होण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
या निर्णयामुळे शासकीय पातळीवरील हालचालींना वेग आला असून आगामी शैक्षणिक वर्षात म्हणजेच येत्या जूनपासूनच सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सोलापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रश्न गेल्या ६० वर्षांपासून प्रलंबित आहे. सोलापूरसाठी मंजूर झालेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय इतर शहरात वळविण्यात आले. याबाबत मागणी केल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न करून सोलापूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरी मिळवून दिली. तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या ३४ एकर जागेवर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करता येईल. याकरिता २५० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून याच अर्थसंकल्पात त्याकरिता तरतूद करावी आणि येत्या जून महिन्यापासून हे महाविद्यालय सोलापूरात सुरू व्हावे अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी २५ फेब्रुवारी रोजी चालू अधिवेशनात केली होती. याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेटही घेतली होती.
त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू व्हावे याकरिता पुढाकार घेतल्याने याबाबत शासकीय पातळीवरील हालचाली अधिक गतिमान झाल्या आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सोलापूर शहर जिल्ह्यातील विद्यार्थी समाज माध्यमांवर आनंद व्यक्त करत आहेत.
———
चौकट
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अधिवेशनानंतर जाणार दिल्लीला
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अधिवेशनानंतर एआयसीटीई च्या मान्यतेसाठी स्वतः दिल्ली येथे जाणार आहेत. त्यामुळे सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याच्या तयारीच्या कामाला मोठी गती मिळणार आहे.
——–
कोट
सोलापूरच्या उच्च शिक्षणाच्या प्रवासातील मैलाचा दगड
तरुणांना सोलापुरातच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून अभियांत्रिकीचे शिक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागणीला यश आले याचे समाधान आहे. याकामी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे सोलापूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होत आहे. शासनाच्या या निर्णयाचा सोलापूरकरांना मोठा फायदा होणार असून सोलापूरच्या उच्च शिक्षणाच्या प्रवासातील हा मैलाचा दगड ठरणार आहे.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य



