maharashtrapoliticalsocialsolapur

फन फेस्टिवल आनंद मेळाव्याचा हजारो सोलापूरकर लुटत आहेत आनंद

सोमवारपर्यंत सुरू राहणार फन फेस्टिवल : आमदार देवेंद्र कोठे यांची माहिती

 

सोलापूर : प्रतिनिधी

आमदार देवेंद्र कोठे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अर्बन स्ट्रीट पार्कमध्ये सोलापूरकरांसाठी पर्वणी ठरलेल्या फन फेस्टिवल आनंद मेळाव्याचा हजारो सोलापूरकर आनंद घेत आहेत. शासकीय तंत्रनिकेतन व नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या लगत असलेल्या अक्कलकोट रस्ता पाणी टाकीजवळ सोमवारपर्यंत हा फन फेस्टिवल आनंद मेळावा होत आहे.

 

 

 

 

या मेळाव्याचे उद्घाटन आमदार देवेंद्र कोठे आणि महापौर विनायक कोंड्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. फन फेस्टिवल आनंद मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी सुमारे दोन हजार सोलापूरकरांनी या मेळाव्याला भेट देऊन आनंद लुटला. या आनंद मेळाव्यात बाळ गोपाळांना खेळण्यासाठीचे साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे अर्बन स्ट्रीट पार्कमध्ये आलेल्या सोलापूरकरांना खाद्यपदार्थांची मेजवानी मिळावी याकरिता कर्णिक नगर परिसरातील भेळ, पाणीपुरी, चटणी पुरी, पॅटीस, दहीवडा, कचोरी, बटाटेवडा अशा अनेक खमंग पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना आवाहन करून जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबासमवेत आलेले सोलापूरकर या खाद्यपदार्थांचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. फिरायला आलेल्या सोलापूरकरांना सुमधुर संगीतही ऐकायला मिळावे याकरिता कराओके संगीत कार्यक्रमाचे आयोजन उद्घाटनाच्या निमित्ताने केले होते. यावेळी कलाकारांनी विविध लोकप्रिय गीते सादर करून सोलापूरकरांची वाहवा मिळवली.

 

 

 

 

अर्बन स्ट्रीट पार्क परिसरात वर्षभर फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. येथे कायमस्वरूपी स्वच्छता रहावी यासाठी सोलापूर महानगरपालिकेतर्फे विशेष नियोजन करण्यात येणार आहे. तसेच अर्बन स्ट्रीट पार्क परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात येणार आहे.
————
चौकट १

सोलापूरला मिळाली नवी चौपाटी

सोलापूर हे विविध खाद्य संस्कृतींनी समृद्ध शहर आहे. महाराष्ट्रासह उत्तर भारतीय तसेच दक्षिण भारतीय पदार्थांची रेलचेल सोलापुरात पाहायला मिळते. अर्बन स्ट्रीट पार्क मधील खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे सोलापुरात पूर्व भागासाठी नवी चौपाटी विकसित झाली आहे.
——–
चौकट २

दुसऱ्या दिवशीही अर्बन स्ट्रीट पार्क हाऊसफुल्ल

फन फेस्टिवल आनंद मेळाव्यात सहभागी होण्यासाठी शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही सोलापूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. सायंकाळी पाच वाजल्यापासूनच हजारो सोलापूरकर फन फेस्टिवलला भेट देण्यासाठी जमले होते. सोलापूरकरांची झालेली तुडुंब गर्दी पाहून चिमुकल्यांसाठी ठेवण्यात आलेल्या खेळण्याच्या साहित्यांची संख्याही वाढविण्यात आली. उन्हाळी सुट्ट्यांमुळे आणि शनिवार, रविवार असल्याने प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.
————


कोट

रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज या विकासकामांसोबतच सोलापूरकरांना मनोरंजनाचीदेखील सोय असली पाहिजे या विचारातून अर्बन स्ट्रीट पार्क परिसरात फन फेस्टिवल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा सोमवारपर्यंत सुरू राहणार असून येथे लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. सोलापूरकरांनी या फन फेस्टिवल आनंद मेळाव्याला लहान मुलांसह भेट द्यावी.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button