ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; बनावट मध निर्मिती कारखान्यावर छापा, २ कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त…

सोलापूर
दि./ ३० जुलै
राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी ‘ऑपरेशन समन्वय’ अंतर्गत मोठी कारवाई करत सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या बनावट मध निर्मिती कारखान्यावर धाड टाकून २ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात बनावट देशी मध, स्पिरिट, तयार ब्लेंड, रसायने, पॅकिंग साहित्य व उत्पादनासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, विभागीय उपायुक्त सागर घोणके यांच्या निर्देशानुसार तसेच अधीक्षक श्रीमती माया जगताप, उपअधीक्षक उमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली २९ जुलै २०२६ रोजी एमआयडीसी परिसरातील मौजे हिंगणगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे ही धडक कारवाई करण्यात आली.
छाप्यात १० हजार लिटर क्षमतेच्या पाच बनावट देशी मध निर्मितीच्या टाक्या, सुमारे २ हजार लिटर तयार बनावट मध, स्पिरिट, तयार ब्लेंड, प्लास्टिक बॅरल, रासायनिक साहित्य, ब्रँडेड कंपन्यांची बनावट लेबले, होलोग्राम, झाकणे, कार्टन बॉक्स, सीलिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, मोबाईल फोन तसेच उत्पादनासाठी लागणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईत एकूण २ कोटी ८ हजार ४७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते ३० जुलै २०२६ या कालावधीत बनावट देशी व विदेशी मद्याविरुद्ध २० गुन्हे नोंदवून २० आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवायांमध्ये आतापर्यंत ७ कोटी २३ लाख ९६ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईतील पथक
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. एम. पाटील, व्ही. बी. चव्हाण, आर. के. चिंगुंडेकर, आर. पी. पवार, ए. बी. बनसोडे, एम. बी. सिद्ध, एस. बी. शेळके, एम. डी. कांबळे, विकास देशमुख, सचिन सातपुते, आलोक पांडे, प्रेम नवनाथ, प्रशांत इंगळे, गजानन डबडे, कपिल स्वामी तसेच महिला व पुरुष जवान आणि इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना बनावट मद्य किंवा मधाची विक्री, निर्मिती अथवा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास तत्काळ विभागाशी संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन केले आहे



