ऑपरेशन समन्वय अंतर्गत मुळेगाव तांड्यावर संयुक्त धडक कारवाई
४,२५० लिटर हातभट्टी रसायनासह ८.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त; ३ गुन्हे दाखल

सोलापूर
दि. २० जून
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या निर्देशानुसार अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात “ऑपरेशन समन्वय” अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील मुळेगाव तांडा येथे विविध विभागांच्या संयुक्त पथकाने मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत ४,२५० लिटर हातभट्टी निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायन जप्त करण्यात आले असून तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर, अधीक्षक भाग्यश्री जाधव व उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग, महावितरण, ग्रामीण पोलीस, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे मोहिम राबवली.
मुळेगाव तांडा परिसरातील अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रे, देशी-विदेशी मद्य विक्री व वाहतूक यांच्यावर छापे टाकण्यात आले. कारवाईदरम्यान ४,२५० लिटर रसायन जप्त करण्यात आले असून तीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये सुमारे रु. १ लाख ६७ हजार ८५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याचवेळी हातभट्टी व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाच्या साठ्याशी संबंधित अनधिकृत सॉ मिलवर वन विभागाने कारवाई करत दोन आरा यंत्रे, तीन ग्राइंडर, एक विद्युत मोटार, सहा चेन सॉ, दोन वजन काटे व १६० घनमीटर लाकूडसाठा जप्त केला. या मुद्देमालाची अंदाजे किंमत रु. ६ लाख ५० हजार इतकी आहे.
महावितरण विभागाने अनधिकृत वीज वापरावरही कारवाई करत ४०० मीटर वीजवाहिनी (वायर) जप्त केली. या कारवाईतील मुद्देमालाची किंमत सुमारे रु. ८ हजार असल्याचे सांगण्यात आले. संयुक्त मोहिमेत एकूण रु. ८ लाख २५ हजार ८५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यापूर्वी ४ जून २०२६ रोजी महानगरपालिका अतिक्रमण विभाग, पोलीस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईत रामलाल चौक व स्टेशन रोड परिसरातील अनधिकृत मद्यविक्री केंद्रांवर कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी अवैध टपऱ्या, सोडा-वॉटर गाड्या तसेच टेबल-खुर्चा जप्त करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, १ एप्रिल ते १९ जून २०२६ या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी ७०८ गुन्हे नोंदवून ५६ वाहनांसह तब्बल २ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी निर्मूलनासाठी पोलीस व इतर यंत्रणांच्या सहकार्याने सातत्याने संयुक्त मोहिमा राबविण्यात येत आहेत. अवैध मद्यविक्री, निर्मिती, वाहतूक तसेच अशा व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या संबंधितांवरही कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
अवैध मद्यनिर्मिती, विक्री, मिथेनॉल, क्लोरल हायड्रेटसारख्या घातक पदार्थांचा वापर, साठवणूक किंवा वाहतूक याबाबत माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



