सोलापूर जिल्हा परिषदेत ‘नो व्हेईकल डे’ उपक्रमाची अंमलबजावणी…

सोलापूर
दर सोमवारी खासगी व शासकीय वाहनांना ब्रेक; पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा अभिनव निर्णय
सोलापूर : वाढते वायू प्रदूषण, जागतिक तापमानवाढ आणि इंधनाच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचत व पर्यावरण संवर्धनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषद सोलापूरकडून प्रत्येक सोमवार हा दिवस ‘नो व्हेईकल डे’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश १२ मे २०२६ रोजी जारी करण्यात आले.
या निर्णयानुसार जिल्हा परिषदेमधील सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रत्येक सोमवारी कार्यालयात येताना खासगी दुचाकी किंवा चारचाकी वाहनांचा वापर टाळायचा आहे. तसेच शक्यतो शासकीय वाहनांचाही वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, बससेवा, सायकल, इलेक्ट्रिक वाहन अथवा पायी प्रवास करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनांचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे हा उपक्रम केवळ औपचारिकता न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. जिल्हा परिषद कार्यालय परिसरात सोमवारी वाहनांची संख्या कमी करण्यासाठी जनजागृतीही करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच इंधन बचतीचा संदेश समाजात पोहोचवण्याचाही या मोहिमेमागचा उद्देश आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी शासकीय यंत्रणेकडून उचलण्यात आलेल्या या पावलाचे विविध स्तरातून स्वागत होत आहे. वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम प्रभावी ठरू शकतात, अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
या आदेशावर जिल्हा परिषद सोलापूरचे अध्यक्ष दीपक वैद्य तसेच उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या स्वाक्षऱ्या असून सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“चला आपण सर्व मिळून देशहितासाठी छोटेसे योगदान देऊया,” असा प्रेरणादायी संदेशही पत्रकाच्या शेवटी देण्यात आला आहे



