आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरील सर्वात मोठा आघात
जेष्ठ पत्रकार अरविंद जोशी : आणीबाणीची ५१ वर्षे विषयावर भाजपतर्फे व्याख्यान

सोलापूर : प्रतिनिधी
भारतात २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचा कालखंड हा भारतीय लोकशाहीवरील सर्वात मोठा आघात होता, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी केले.
आणीबाणीला ५१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीतर्फे भाजप शहर कार्यालयात ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आणीबाणी मध्ये कारावास भोगलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान भाजपातर्फे करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टी सोलापूर शहरच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, सरचिटणीस तथा नगरसेवक प्रा. डॉ. नारायण बनसोडे,सरचिटणीस सुधा अळ्ळीमोरे , सरचिटणीस शिवराज सरतापे उपस्थित होते.
जेष्ठ पत्रकार अरविंद जोशी म्हणाले,
लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या असंख्य देशभक्तांच्या त्यागाचे स्मरण करून आजच्या पिढीने त्या इतिहासातून बोध घेण्याची आवश्यकता आहे. आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांवर लादण्यात आलेली सेन्सॉरशिप, विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या झालेल्या अटकसत्र, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवरील निर्बंध, राज्यघटनेतील करण्यात आलेल्या वादग्रस्त दुरुस्त्या तसेच लोकशाही व संविधानिक मूल्यांवर झालेल्या आघाताचा सविस्तर आढावा श्री. जोशी यांनी घेतला.
यावेळी आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करत तुरुंगवास भोगलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा करण्यात आला. यामध्ये रामचंद्र तडवळकर, गुरुराज कुलकर्णी, भारत तांबोळकर, जगदीश तुळजापूरकर आणि शिरीष कुलकर्णी यांचा सन्मान करत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध मोर्चांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



