लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

सोलापूर
निर्मलकुमार फडकुले पटांगण येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे व कार्याध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजीतात्या वाघमोडे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.ब्रिटिश राजवटीत अनेक संस्थानिक होते जे आज कुणाच्या स्मरणात देखील नाहीत. एकमेव छत्रपती शाहू महाराज आज त्यांच्या लोककल्याणकारी कारभाराने जनतेच्या चिर स्मरणात आहेत.
गोर-गरिबांची लेकरं शिकावीत म्हणून प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणारे, मागासलेला वर्ग मुख्य प्रवाहात यावा म्हणून आरक्षणाचा कायदा करणारे, उद्योग नगरी म्हणून कोल्हापूरची ओळख निर्माण करणारे, कुस्तीगीरांसाठी खासबाग सारखं मैदान निर्माण करून पहिलवानांना प्रोत्साहन देणारे, राधानगरी सारखं धरण निर्मिती करणारे, धार्मिक विषमतेविरुद्ध कृतिशील धोरण आखणारे द्रष्टे राज्यकर्ते म्हणून छत्रपती शाहू महाराजांचे कार्य कालातीत आहे असे मत श्रीकांत डांगे यांनी व्यक्त केले.
तसेच पुरोगामी महाराष्ट्राचा भक्कम पाया शाहू महाराजांनी घातला. शिवरायांच्या रयत कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याचा खजिना खुला केला. बहुजनांची लेकरं शिकावीत म्हणून सगळ्या जाती- धर्मासाठी वसतिगृहे उभारली.
या देशावर, बहुजन समाजावर छत्रपती शाहू महाराजांचे कधी न मिटणारे उपकार आहेत. याच कृतज्ञ भावनेतून आज संभाजी आरमारच्या वतीने शाहू महाराजांना अभिवादन केले असे मत शिवाजी वाघमोडे यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.
यावेळी सरचिटणीस गजानन जमदाडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, संघटक प्रकाश डांगे, शहर प्रमुख सागर ढगे, शहर संघटक राज जगताप, उपशहर प्रमुख सागर दासी, शिव पालखी प्रमुख अर्जुन शिवशिंगवाले, मल्लिकार्जुन पोतदर, अविनाश विटकर,महेश घोडके,रोहन तपासे, सुधाकर करणकोट, प्रदीप मोरे आदि सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…



