सोलापूर महानगरपालिका महिला व बाल कल्याण समिती विभागातर्फे 431 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण

सोलापूर
दि. २४ जून २०२६ :
सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती विभागाच्या वतीने मनपा संचलित माध्यमिक शाळांमधील इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय पाठ्यपुस्तक वितरण समारंभाचे आयोजन बुधवार, दि. २४ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता महानगरपालिका मराठी मुलींची शाळा, कॅम्प, दक्षिण सदर बाजार, टक्कर, सोलापूर येथे करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वेळेत उपलब्ध करून देणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणास प्रोत्साहन देणे, मनपा शाळांमधील पटसंख्या वाढविणे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून देणे या उद्देशाने महिला व बाल कल्याण समिती विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मनपा प्रशाला क्र. १, २, ३ व ४, मनपा उर्दू कॅम्प शाळा, जय भवानी प्रशाला तसेच सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूल येथील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी श्रीमती सोनाली यादव यांनी केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपमहापौर श्रीमती ज्ञानेश्वरी देवकर यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी तसेच त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मा. स्थायी समिती सभापती श्रीमती रंजिताताई चाकोते यांनी महिला बालकल्याण विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक करत मनपा माध्यमिक प्रशालांमध्ये आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. तसेच मा.नगरसेवक आसादे (सर) नरसिंग रामपुरे यांनी शाळांच्या दुरुस्ती व बांधकामासाठी आवश्यक उपाययोजना करून शाळा अधिक सुसज्ज व सुरक्षित करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.
मनपा माध्यमिक प्रशालांच्या मागणीनुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षी इयत्ता 9 वीचे 204 विद्यार्थी व इयत्ता 10 वीचे 227 विद्यार्थी असे एकूण 431 विद्यार्थ्यांना सुमारे 3,991 पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. या पाठ्यपुस्तकांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, जलसुरक्षा, संरक्षणशास्त्र, रिटेल, ऑटोमोबाईल व उर्दू विषयांचा समावेश होता.
कार्यक्रमास मा.उपमहापौर श्रीमती ज्ञानेश्वरी देवकर, मा.स्थायी समिती सभापती श्रीमती रंजिताताई चाकोते, मा.गटनेत्या एम.आय.एम. श्रीमती वहीदाबानो कासिमसाब शेख, तसेच मा.नगरसेवक आसाद (सर) नरसिंग रामपुरे, मा.नगरसेविका श्रीमती श्वेता खरात (खांडेकर), मा.नगरसेविका श्रीमती कल्पना कदम आणि मा.नगरसेवक श्री प्रियदर्शन साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शिक्षण मंडळाचे नियंत्रण अधिकारी व मुख्यलेखापाल मा.श्री रत्नराज जवळगेकर, प्रशासन अधिकारी मल्हारी माने, महिला व बाल कल्याण अधिकारी अजितकुमार खानसोळे, कॅम्प शाळेच्या मुख्याध्यापिका हंचाटे ,वरिष्ठ श्रेणी लिपिक श्रीनिवास पेडंटी, समूह संघटक ऋषिकेश लोखंडे, कनिष्ठ श्रेणी लिपिक प्रथमेश सदाफुले व नितीन मुंडे यांच्यासह माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शैक्षणिक प्रगतीसाठी परिश्रम, शिस्त आणि सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. उपस्थित पालक व विद्यार्थ्यांनी महिला व बाल कल्याण समिती विभागाच्या या उपक्रमाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले.



