ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विशेष सन्मान

सोलापूर
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे हे रविवारी सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आले असता ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ईच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक तथा सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ चे भाजप नगरसेवक किसन जाधव यांच्या पुढाकारातून अशोक चौक परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानासमोर हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी नामदार बावनकुळे यांना सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेतील प्रमुख आकर्षण असलेल्या सातही मानाच्या नंदीध्वजांचे प्रतीक असलेली बाराबंदी पोशाखातील नंदिध्वज धारक सिद्धरामेश्वरांची आकर्षक मूर्ती भेट देण्यात आली. तसेच शाल, पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांचा सन्मान करण्यात आला .
यावेळी बोलताना नामदार बावनकुळे यांनी सोलापूरच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे कौतुक केले. सोलापूरची सिद्धरामेश्वर यात्रा ही राज्याच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे. समाजातील एकोप्याची भावना जपणारे असे उपक्रम प्रेरणादायी आहेत, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी महापौर श्रीकांचना यन्नम, सचिन उर्फ अक्षय जाधव यांच्यासह भाजपा नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते आणि ईच्छा भगवंताची परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.



