मनसे विद्यार्थी शहर प्रमुखाच्या खून प्रकरणातील आरोपी शारदा शिंदे हीस जामीन मंजूर

सोलापूर-
जोशी गल्ली, रविवार पेठ परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहर प्रमुख बाळासाहेब पांडुरंग सरवदे याची तलवार व कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्या प्रकरणी अटकेत असलेली आरोपी शारदा तानाजी शिंदे यांचा जामीन अर्ज मे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री.राजवैद्य पि.पि.यांनी मंजूर केला.
याबाबत हकिकत अशी की, मयताचे भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे (वय २५, रा. जोशी गल्ली, रविवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींनी निवडणुकीत उभे राहू नये म्हणून धमकी दिली होती अपक्ष अर्ज मागे घ्या, नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी उघड धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. दि.२ जानेवारी रोजी दुपारी १ ते सायंकाळी ४.४५ च्या दरम्यान हनुमान मंदिराजवळ आरोपींनी वाद घालून बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यांत चटणी टाकून त्यांना काहीही दिसू नये अशी स्थिती निर्माण केली. त्यानंतर काही आरोपींनी त्यांचे हात पकडले, तर काही आरोपींनी तलवार व कोयत्याने छातीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेप्रकरणी एकूण 15 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती त्यापैकी शारदा तानाजी शिंदे हिने अँड. संतोष न्हावकर यांच्यामार्फत मे. न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
यात आरोपी तर्फे युक्तिवाद करताना अँड. संतोष न्हावकर यांनी युक्तिवाद करताना आरोपीने मयताच्या डोळ्यात चटणी टाकली असल्याचा आरोप आहे परंतु फॉरेन्सिक टिमला तपासणीत चटणी मिळाली नसल्याचा रिपोर्ट असून शवविच्छेदन अहवालात सुध्दा डोळ्यात चटणी दिसून येत नसल्याचे तसेच बाकी नेत्रसाक्षीदार शारदावर काहीच आरोप करीत नसल्याचे युक्तिवाद न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले .
सदरचा युक्तिवाद ग्राह्य़ धरून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.
यात आरोपी तर्फे अँड. संतोष न्हावकर, अँड.राहुल रूपनर अँड. मीरा पाटील यांनी तर सरकार पक्षातर्फे अँड. प्रदीपसिंह रजपूत यांनी काम पाहिले.



