मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : हजारोंच्या गर्दीत भाजपातर्फे विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळा उत्साहात
सोलापूरकरांच्या मताचे कर्ज भरघोस विकासाच्या रूपाने फेडणार:- मुख्यमंत्री

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरकरांनी भाजपावर मतदानातून ऐतिहासिक विश्वास दाखवला आहे. आम्ही सर्व भाजपाचे कार्यकर्ते सोलापूरकरांच्या कर्जात आहोत. सोलापूरकरांच्या प्रेमाच्या कर्जात आम्ही जन्मभर राहूच परंतु हे कर्ज विकासाच्या रूपाने निश्चित फेडणार असल्याचे अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांना दिले. भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळा हजारोंच्या गर्दीत उत्साहात झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेला संबोधित केले.
प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार सुभाष देशमुख, आमदार विजय देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार समाधान आवताडे, आमदार योगेश टिळेकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, माजी आमदार दिलीप माने, राजन पाटील, यशवंत माने, नरसिंग मेंगजी, प्रशांत परिचारक, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, मनपा सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर तसेच भाजपचे शहर जिल्ह्यातील नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सोलापूरकरांनी जो विश्वास भाजपावर टाकला आहे तो वाया जाऊ देणार नाही. सोलापूरचे लोकप्रतिनिधी पारदर्शी आणि प्रामाणिकपणे काम करतील हा विश्वास आहे. इतक्या प्रचंड उन्हातही सोलापूरकरांनी मेळाव्याला हजारोंच्या संख्येने लावलेली हजेरी पाहून कोणतेच अडथळे सोलापूरकरांना थांबवू शकत नाहीत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी म्हणाले.
“जनता विकास आणि व्यवहार दोन्ही पाहते. त्यामुळे भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी पारदर्शी, प्रामाणिक काम करण्याबरोबरच जनतेशी चांगला व्यवहारही ठेवावा. विकासाची काळजी माझ्यावर सोडून द्या, सोलापूरला जे जे लागेल ते निश्चित देईन, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी सांगितले.
पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सोलापूर महानगरपालिकेमध्ये प्रथमच भाजपची स्वबळावर सत्ता आली आहे. ३० वर्षांच्या इतिहासात जिल्हा परिषदेत ३८ जागा जिंकत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ४ नगराध्यक्ष भाजपाचे झाले आहेत. ११ पैकी १० पंचायत समित्यांचे सभापती भाजपचे आहेत. २०१७ च्या निवडणुकीत विविध नगरपालिकांमध्ये मिळून भाजपचे ३१ नगरसेवक होते. ते वाढून यंदा १४४ झाले आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण जिल्हा भाजपमय केला आहे. जनतेने दिलेल्या विश्वासास पात्र राहून लोकप्रतिनिधींनी विकास करावा, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी सांगितले.
भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी प्रास्ताविक केले. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन तर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले.
——–
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणा
#सोलापुरात आधुनिक रेडिमेड पार्क तयार करणार.
# आयटी पार्कच्या माध्यमातून तरुणांना इथेच रोजगार देणार.
#५ वर्षांनी मते मागायला येऊ तेव्हा दररोज मुबलक पाणी देणार.
# उड्डाणपुलाच्या पूर्ततेसाठी ना हरकत प्रमाणपत्राकरिता पुढील १५ दिवसात दिल्लीत बैठकीत लावणार.
# दुबईत होणाऱ्या गारमेंट एक्सपोसाठी महाराष्ट्र सरकार भागीदार बनणार.
#१३ चाळी आणि २२ सोसायट्यांचा फ्रीहोल्ड करण्यासाठी सकारात्मक पावले उचलणार.
# सोलापूरच्या विमानतळावर लवकरच नाईट लँडिंगची सोय करणार.
# नाशिक – सोलापूर – अक्कलकोट रस्त्याने सोलापूरला वाढवण बंदराशी जोडणार.
# याचवर्षी पंढरपूर कॅरिडॉरचे काम सुरू करणार. त्यामुळे स्थानिक दुकानदारांचा व्यवसाय १० पटींनी वाढणार.
# महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी लागेल तितका निधी तत्काळ देणार.
——–
चौकट १
सोलापूरकरांतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष सन्मान
सोलापूर शहर जिल्ह्याचा गतिमान विकास करण्यासाठी दमदार पावले उचलणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूरकरांच्यावतीने भाजपातर्फे पगडी, तुळशीहार, गणपती बाप्पांची मूर्ती देऊन विशेष सन्मान करण्यात आला. सोलापूरकरांनी केलेला हा सत्कार पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले.
——-
चौकट २
नवनियुक्त लोकप्रतिनिधींचा मुख्यमंत्र्यांनी केला सन्मान
नुकत्याच झालेल्या सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांमध्ये विजय मिळवलेल्या लोकप्रतिनिधींचा तसेच महापौर विनायक कोंड्याल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, महापालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे, जिल्हा परिषदेच्या गटनेत्या रश्मी बागल, महापालिका स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्यासह जिल्ह्यातील नगरपरिषदांचे नगरपालिकांचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या विजयात मोठे योगदान देणारे पालकमंत्री जयकुमार गोरे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांचाही सन्मान याप्रसंगी भाजपातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
——-
चौकट ३
पालकमंत्र्यांच्या मागण्यांना मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोलापूर शहर जिल्ह्याच्या विकासासंदर्भात मागण्या मांडल्या. मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकासाठीची उर्वरित प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी, सोलापूर – मुंबई विमानसेवेसाठी सकाळचा सोयीचा स्लॉट मिळावा, इचलकरंजीप्रमाणे सोलापुरातील वस्त्रोद्योगाला सवलती मिळाव्यात, उड्डाणपुलासाठी रेल्वे, संरक्षण आणि दूरसंचार विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळावे अशा मागण्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या होत्या. पालकमंत्री श्री. गोरे यांच्या या मागण्यांना अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या विकासासाठी हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
——–
चौकट ४
पालकमंत्री गोरे, आमदार कल्याणशेट्टी आणि आमदार कोठेंचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे नेतृत्व करणारे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. आमदार देवेंद्र कोठे यांचे कौतुक करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तरुण तडफदार’ असा उल्लेख करताच सोलापूरकरांनी प्रचंड टाळ्या आणि शिट्ट्यांनी प्रतिसाद दिला.



