पशुवैद्यकीय सेवांच्या दुर्लक्षावरून रयत क्रांती शेतकरी संघटनेचा संताप; कृषी व पशु संवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे उपाययोजनांची मागणी

सोलापूर (प्रतिनिधी):
रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाकडून मिळणाऱ्या अपुऱ्या व निष्क्रिय पशुवैद्यकीय सेवांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत तातडीने उपाययोजना राबविण्याची मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांनी केली आहे . याबाबतचे निवेदन कृषी व पशुसंवर्धन समिती, जिल्हा परिषद सोलापूर यांना नामदेव पवार यांनी दिले.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील पशुपालकांना अपेक्षित पशुवैद्यकीय सेवा वेळेवर मिळत नसल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
अनेक गावांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध नसतात तसेच गाव भेटींचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे जनावरांना आजार झाल्यास तात्काळ उपचार मिळत नाहीत आणि काही वेळा परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता निर्माण होते.
सरकारी यंत्रणेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पशुपालकांना खासगी डॉक्टरांवर अवलंबून राहावे लागते. मात्र, त्यासाठी मोठा खर्च करावा लागत असल्याने आर्थिक ताण वाढत आहे. अनेक वेळा सरकारी दवाखान्यांमध्ये डॉक्टर अनुपस्थित असतात किंवा पशुपालकांनाच जनावरे दवाखान्यात आणावी लागतात, ज्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम वाया जातात.
या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत:
प्रत्येक गावात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियमित भेटी सुनिश्चित कराव्यात
आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ सेवा मिळण्यासाठी हेल्पलाईन सुरू करावी
सरकारी दवाखान्यांमध्ये डॉक्टरांची नियमित उपस्थिती बंधनकारक करावी
गावागावात लसीकरण व आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत.
संबंधित अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक देखरेख व जबाबदारी निश्चित करावी
पशुपालकांना अनावश्यक त्रास होऊ नये यासाठी घरपोच सेवा अधिक प्रभावी करावी
सदर निवेदनाद्वारे प्रशासनाने या गंभीर विषयाची तात्काळ दखल घेऊन ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली .
या निवेदना प्रसंगी अमोल वेदपाठक , रमेश बंगे, रेवप्पा सुतार , कोकरे , यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.



