मुळेगाव गोळीबार प्रकरणाचा छडा; मुख्य सूत्रधारासह आठ आरोपी जेरबंद, पिस्तूल व शस्त्रे जप्त…

सोलापूर, दि. २७ जुलै :
मुळेगाव परिसरात एपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीच्या कलेक्शनची रक्कम घेऊन जाणाऱ्या चालकावर गोळीबार करून दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा सोलापूर तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिस्तूल, सत्तूर, एक इर्टिगा कार आणि दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास एपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीचा चालक एजाज नबीलाल तांबोळी (वय ३७, रा. कर्णिकनगर, सोलापूर) दिवसभराचे कलेक्शन मालकांच्या घरी घेऊन जात होता. त्यावेळी सोलापूर-हैदराबाद महामार्गालगत मुळेगाव परिसरात पांढऱ्या रंगाच्या इर्टिगा कारमधून आलेल्या तिघांनी त्याला अडवले. यातील एका आरोपीने चालकाला जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तूलातून दोन गोळ्या झाडल्या. गोळीचा छरा चालकाच्या छातीच्या उजव्या बाजूस लागल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर अज्ञात तिघांविरुद्ध १६ जुलै रोजी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी सुरू केला. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथके तयार करण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांनी अवघ्या २४ तासांत चार आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत आणखी चार आरोपींचा सहभाग उघडकीस आला. त्यानुसार सर्व आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधारालाही पोलिसांनी शोधून काढत अटक केली. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक २, सोलापूर येथे हजर केले असता न्यायालयाने २९ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुख्य सूत्रधाराकडून गोळीबारासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल जप्त करण्यात आले असून, इतर आरोपींकडून सत्तूर हस्तगत करण्यात आला आहे. यापूर्वीच गुन्ह्यात वापरण्यात आलेली इर्टिगा कार आणि दोन दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
यामध्ये आरोपी
1) श्रीकांत दत्तात्रय गाडेकर, वय 36 रा.उळेवाडी ता.द.सोलापूर जि.सोलापूर
2) अंकुश दशरथ गायकवाड, वय 19
3) महादेव गुरूनाथ विभुते, वय 24
4) सुफियान शब्बीर मुल्ला, वय 19 तिघे रा.बोरामणी ता.द.सोलापूर
5) निखील मल्लीनाथ पटणे उर्फ गोटया, वय 21 रा.बोरामणी ता.द.सोलापूर
6) साजीद सलाम पटेल, वय 21 रा.बोरामणी ता.द.सोलापूर
या आरोपींना सध्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेक सांजेकर, पोलीस हवालदार राहुल महिंद्रकर, शशिकांत कोळेकर, महेश कटकधोंड, धनराज गायकवाड, फिरोज मियाँवाले, पोलीस नाईक अनंत चमके, पोलीस अंमलदार पैंगबर नदाफ, फिरोज बारगीर, सचिन मागाडे, सागर शिंदे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार निखिल पवार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



