india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली फटाके स्टॉल असोसिएशनसोबत बैठक…

वीर सावरकर मैदान व चार हुतात्मा पुतळा पाठीमागील स्टॉल क्षमते अनुसार देणार व उर्वरित स्टॉल होम मैदानावर देण्यात येणार..

 

सोलापूर

दि. २६ ऑक्टोबर :

 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील फटाके विक्री स्टॉलच्या नियोजनाबाबत महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात फटाके स्टॉल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. नागरिकांची सुरक्षितता, अग्निसुरक्षा, आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधा आणि शासनाच्या नियमांचे पालन या बाबींना प्राधान्य देत सावरकर मैदान व चार पुतळ्यांमागील पार्क स्टेडियम येथे उपलब्ध जागेच्या क्षमतेनुसारच फटाके स्टॉलना परवानगी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. व उर्वरित स्टॉल होम मैदानावर देण्यात येणार.यंदाच्या वर्षी ही व्यवस्था लागू राहणार असून, पुढील वर्षापासून शहरातील सर्व फटाके स्टॉल होम मैदानावर स्थलांतरित करण्याबाबत असोसिएशनने सहमती दर्शविली.या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडळवकर, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, पोलीस उपायुक्त विजयालक्ष्मी कुरी, नगर अभियंता नीलकंठ मठपती, अग्निशमन विभागप्रमुख राकेश साळुंखे तसेच फटाके स्टॉल असोसिएशन सुनील रसाळे, बसवराज येरटे, गौरव बेंद्रे, अनिल सावंत, सुनील कत्ते, सन्मित्र काटकर, बाळासाहेब दर्गोपाटील, मनोज जगताप, सुरेश चंद्रगुप्ता, माऊली भोजरंगे, गणेश साठे, अंकिता भुजंग, गणेश घाडगे आदी उपस्थित होते.

 

 

 

बैठकीत बोलताना महापौर विनायक कोंड्याल म्हणाले की, दिवाळीच्या काळात फटाके विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असते. त्यामुळे फटाके स्टॉलची उभारणी करताना सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. शासनाच्या नियमानुसार आवश्यक अंतर, मोकळी जागा आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना सहज प्रवेश मिळेल, अशी व्यवस्था असणे गरजेचे आहे. उपलब्ध जागेपेक्षा अधिक स्टॉल उभारल्यास आपत्कालीन परिस्थितीत अडचणी निर्माण होऊन जीवितहानीचा धोका संभवतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

 

 

 

 

 

वीर सावरकर मैदान आणि चार पुतळ्यांमागील पार्क स्टेडियम येथे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने फटाके स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. मात्र, या ठिकाणांची क्षमता मर्यादित असल्याने शासनाच्या निकषांनुसार जेवढे स्टॉल सुरक्षितपणे उभारता येतील, तेवढ्याच स्टॉलधारकांना परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी फटाके स्टॉल असोसिएशनने पूर्वीपासून व्यवसाय करणाऱ्या अधिकृत स्टॉलधारकांची यादी महानगरपालिकेला सादर करावी, असे निर्देश देण्यात आले. उपलब्ध जागेची क्षमता निश्चित करून त्यानुसार स्टॉलचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच यावेळी वीर सावरकर मैदान येथे व चार हुतात्मा पुतळा या ठिकाणी जे जुने स्टॉल धारक आहेत त्यांचे नावं असोशियन कडूनच उपलब्ध करून द्यावे. त्यानुसार त्यांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात येईल.

 

 

 

 

अग्निशमन दलाच्या वाहनांना ये-जा करण्यासाठी पुरेशी जागा, आवश्यक सुरक्षित अंतर आणि स्टॉलधारकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावरही बैठकीत चर्चा झाली. महापालिका प्रशासनाच्या वतीने सर्व नियमांचे पालन करूनच स्टॉल उभारणीस परवानगी देण्यात येईल. वीर सावरकर मैदान आणि पार्क स्टेडियम येथील उपलब्ध क्षमतेनुसार स्टॉलधारकांना जागा देण्यात येणार असून, उर्वरित स्टॉलधारकांसाठी होम मैदानाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

 

 

 

फटाके विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, याचाही प्रशासनाने विचार केला आहे. अनेक स्टॉलधारकांनी दिवाळीच्या सुमारे तीन महिने आधीपासून फटाक्यांचा साठा खरेदी केलेला असल्याने यंदा अचानक स्थलांतर केल्यास त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी उपलब्ध जागेच्या क्षमतेनुसार स्टॉलधारकांना सामावून घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. मात्र, पुढील वर्षापासून सर्व फटाके स्टॉल होम मैदानावर हलविण्याबाबत असोसिएशनने बैठकीत सहमती दर्शविली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button