हृदयरोग तज्ञ पत्नीच्या गर्भपात प्रकरणी अस्थिरोग शल्यचिकित्सक पतीस अटकपूर्व जामीन: ॲड. धनंजय माने…

सोलापूर
हृदयरोग तज्ञ (कार्डीऑलॉजिस्ट) असलेल्या पत्नीचा जबरदस्तीने गर्भपात केल्याच्या आरोपावरुन अस्थिरोग शल्यचिकित्सक (आर्थोपेडीक सर्जन) असलेल्या पतीविरुध्द विजापूर नाका पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यात पतीस सत्र न्यायालयाने अटकपुर्व जामीन मंजुर केला.
सोलापूरची रहिवासी असलेल्या हृदयरोग तज्ञ (कार्डिओलॉजिस्ट) असलेल्या महिला डॉक्टरचा विवाह नाशिक येथील अस्थिरोग शल्यचिकित्सक (आर्थोपेडीक सर्जन) सर्जन बरोबर जून २०२५ मध्ये सोलापूर मध्ये झाला होता. लग्नानंतर आठ दहा दिवसानंतर नवरा, सासू ,सासरे व दोन नणंदा या सर्वांनी माहेरवरून पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ चालू केला, सर्वांनी माहेरुन पैसे आण नाहीतर गर्भपात कर असे म्हणून माझे इच्छेविरुध्द बळजबरीने नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये जबरदस्तीने गर्भपात केला असा आरोप हृदयरोग तज्ञ पत्नीने विजापूर नाका पोलीस स्टेशनला दाखल दाखल केलेल्या फिर्यादीत केला होता. त्या फिर्यादीवरून पती , सासरा ,सासू , दोन नणंदा यांचेविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. सर्जन पतीने दाखल झालेल्या फिर्यादी संदर्भात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी सोलापूर न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
सदर जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान पतीचे वकील ॲड. धनंजय माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की सदरचा खटला म्हणजे महिला कायद्याचा कसा दुरुपयोग केला जातो याचे जिवंत उदाहरण आहे. सासू-सासरे तालुक्याच्या ठिकाणी राहत होते, वकील असलेली विवाहीत नणंद मुंबई येथे तर दुसरी विवाहीत नणंद अहिल्या नगर येथे कुटूंबियासोबत राहत होत्या. फिर्यादी पत्नी नाशिक शहरामध्ये फ्लॅटमध्ये राहत होती. तिने स्वइच्छेने गर्भपात केला हे वैद्यकीय कागदपत्रावरून दिसून येते. धक्कादायक बाब म्हणजे ज्या दिवशी तिने स्वइच्छेने गर्भपात केला त्या दिवशी त्या दवाखान्याच्या परिसरातील दुसऱ्या बिल्डींगमध्ये सासु तिला झालेल्या कॅन्सर आजारावर उपचारासाठी ॲडमिट होती. कॅन्सरग्रस्त सासुची सुषृशा करण्याऐवजी शेजारच्या बिल्डींगमध्ये गर्भपात करुन घेतला.
केवळ सासरच्या लोकांना त्रास देण्यासाठी सदरची फिर्याद देण्यात आलेली आहे.फिर्यादीने स्वैच्छेने गर्भपात केला हे कागदपत्रावरून दिसून येत असल्याने न्यायालयाने डॉक्टर पतीचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या प्रकरणी सर्जन पती तर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. प्रणित जाधव, ॲड. किरण गवळी यांनी काम पाहिले.



