india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीच्या पहिल्या दीक्षांत समारंभाचे येत्या रविवारी आयोजन

_पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आणि बालाजी अमाइन्सचे डी. राम रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती_

 

सोलापूर

दि. २२ ऑक्टोबर :

 

 

गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीच्या पहिल्या दीक्षांत समारंभाचे आयोजन रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता केगाव, सोलापूर येथील युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये करण्यात आले आहे.
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) माजी महासंचालक पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर उपस्थित राहणार आहेत. तर बालाजी अमाइन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष व कुलपती प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड चाटे आणि कुलगुरू प्रा. गोपाळकृष्ण जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडणार आहे.

 

 

 

या पहिल्या दीक्षांत समारंभात बीसीए (२०२३–२०२६), एमबीए आणि एमसीए (२०२३–२०२५ व २०२४–२०२६) या अभ्यासक्रमांच्या एकूण ९० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. तसेच उल्लेखनीय शैक्षणिक यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
संस्थापक-अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या दूरदृष्टीतून १९८३ मध्ये पुणे येथे स्थापन झालेल्या ‘महाराष्ट्र अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग अँड एज्युकेशनल रिसर्च’ (माईर्स) या संस्थेने शिक्षण व सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. चार दशकांहून अधिक समृद्ध शैक्षणिक परंपरेचा वारसा पुढे नेणारे ‘एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी’ हे २०२३ मध्ये सोलापूर येथे स्थापन झालेले माईर्स एमआयटी समूहाचे पाचवे विद्यापीठ आहे. उद्योगक्षेत्राशी समन्वय साधणारे शिक्षण, प्रत्यक्ष अनुभवावर आधारित अध्ययन आणि नवोपक्रमाभिमुख अध्यापन पद्धती यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम बनविण्यावर विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीचा भर आहे. शैक्षणिक गुणवत्ता, सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास, सर्वसमावेशकता, शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धन या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून जागतिक दृष्टिकोन असलेले आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार नागरिक घडविण्याचे युनिव्हर्सिटीचे उद्दिष्ट आहे.

 

 

 

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करणारा हा दीक्षांत समारंभ एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीच्या शैक्षणिक वाटचालीतील एक महत्त्वाचा अध्याय ठरणार आहे. अशी माहिती एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीचे कुलसचिव प्रा. प्राणेश मुरनाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button