entertainmentindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

शिवस्मारकतर्फे किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन

सहभागी होण्याचे सोलापूरकरांना आवाहन

 

सोलापूर : प्रतिनिधी

श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारकतर्फे ४ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान नवी पेठ येथील शिवस्मारक पटांगणात किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

दिवाळी म्हटली की लक्ष्मीपूजन, फराळ, सुट्टीची धमाल यांबरोबरच किल्ले बांधणीही डोळ्यांसमोर येते. त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयातील तरूणांना किल्ले बांधणी करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता दरवर्षीप्रमाणे शिवस्मारकतर्फे किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

 

 

 

अवघ्या देशाचेच दैवत असलेल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे किल्ले म्हणजे भारतीयांसाठी जणू तीर्थक्षेत्रेच आहेत. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडदुर्गांची अधिक विस्ताराने माहिती मुलांना व्हावी या उद्देशाने दरवर्षी शिवस्मारकतर्फे हा उपक्रम राबविला जातो.

ही स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन व खुला अशा तीन गटांत होणार आहे. शाळा, महाविद्यालयास १० जणांचा एक असे कितीही गट पाठविण्याची मुभा आहे.

 

 

 

किल्ले बांधणीसाठी लागणारे दगड, माती, मुंबई माती, पाणी आयोजकांकडून देण्यात येणार आहे. स्पर्धक संघांनी बुधवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ पासून शनिवार, दि. ७ नोव्हेंबरच्या दुपारी तीन वाजेपर्यंत किल्ले बनविणे अपेक्षित आहे. शनिवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता किल्ले प्रदर्शनाचे उद्घाटन हिंदवी स्वराज्याचे सरदार कान्होजी जेधे यांचे १३ वे वंशज श्री. युवराजजी जेधे यांच्या हस्ते होणार असून त्याच दिवशी परिक्षणही होणार आहे. त्यानंतर सोलापूरकरांना किल्ले पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. तर स्पर्धेचे पारितोषिक वितरण नरवीर शिवा काशीद यांचे १३ वे वंशज आनंदराव काशीद यांच्या हस्ते होणार आहे.

 

 

 

 

किल्ला बांधणी स्पर्धेसाठीची नोंदणी शाळा, महाविद्यालय आणि खुल्या गटांनी सोमवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत शिवस्मारक कार्यालयात करावी. या स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्या संघांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र, पुस्तक देण्यात येणार आहे. तसेच उल्लेखनीय सहभागाकरिता शाळेच्या शिक्षकास, उत्कृष्ट सांघिक काम करणाऱ्या गटास आणि किल्ल्याची योग्य माहिती देणाऱ्या गटास विशेष पारितोषिकही देण्यात येणार आहे. या स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम विजेत्या संघास पाच हजार रुपये, द्वितीय विजेत्या संघास तीन हजार रुपये तर तृतीय विजेत्या संघास दोन हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत अधिकाधिक सोलापूरकरांनी सहभागी व्हावे व अधिक माहितीसाठी शिवस्मारकचे व्यवस्थापक मल्लिनाथ व्हटकर यांच्याशी ९८२२४९८३७३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शिवस्मारकचे सचिव गंगाधर गवसने यांनी केले आहे.

 

 

 

 

या पत्रकार परिषदेस शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, सचिव गंगाधर गवसने, कोषाध्यक्ष धनंजय कुलकर्णी, संचालक पुरुषोत्तम कारकल, संचालिका माधवी कुलकर्णी, व्यवस्थापक मल्लिनाथ व्हटकर उपस्थित होते.
———–
चौकट
विजेत्या संघाला नि: शुल्क गडदर्शन

शिवस्मारकच्या किल्ला बांधणी स्पर्धेतील विजेत्या गटांना शिवस्मारकतर्फे नि:शुल्क गड दर्शन उपक्रम राबविण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गडाचे दर्शन घेऊन इतिहासाची माहिती जाणून घेता यावी, या हेतूने हा नि:शुल्क गड दर्शन उपक्रम शिवस्मारकतर्फे आयोजित केल्याचे शिवस्मारकचे सचिव गंगाधर गवसने यांनी सांगितले.
————-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button