बी टू, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, उड्डाणपूल अन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तलाव विकासाबाबत आमदार देवेंद्र कोठे यांची अधिवेशनात मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मागण्या पूर्ण होण्याचा विश्वास

सोलापूर : प्रतिनिधी
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी रात्री उशिरा शहरातील बी टू, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, उड्डाणपूल अन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तलाव विकासाबाबत शासनाकडे मागण्या केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न सुटण्याचा विश्वास देखील आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, सोलापूर शहरातील १३ कामगार चाळी, २१ सोसायटी आणि इतर अनेक जागांवर चुकीच्या पद्धतीने बीटू लावण्यात आलेला आहे. तत्कालीन ब्रिटिश जिल्हाधिकाऱ्यांनी शहराचा विकास करताना या जमिनी लोकांना विकल्या होत्या. मागील ६० ते ७० वर्षांमध्ये या भागातील खरेदी-विक्री थांबलेली नव्हती. बांधकाम परवाने, वापर परवाने देखील मिळत होते. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात यावर बंदी आणण्यात आली. त्यामुळे नागरिकांना बांधकाम परवाना खरेदी विक्री करता येत नाही. यातील काही चाळी १०० वर्षे जुन्या आहेत.
त्यामुळे त्या पडल्यास याठिकाणी जीवितहानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेला बीटू माफ करावा आणि शहराच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी केली.
सोलापूर शहरासाठी मंजूर झालेल्या दोन उड्डाणपूलांचे काम केंद्र आणि राज्य सरकारच्या जागा हस्तांतरित न झाल्यामुळे रखडले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लवकरात लवकर बैठक घेऊन या जागा हस्तांतरित करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी विनंतीही आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी केली.
सोलापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रश्न गेल्या ६० वर्षांपासून प्रलंबित आहे. सोलापूरसाठी मंजूर झालेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय इतर शहरात वळविण्यात आले. याबाबत मागणी केल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न करून सोलापूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरी मिळवून दिली. तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या ३४ एकर जागेवर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करता येईल. याकरिता २५० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून याच अर्थसंकल्पात त्याकरिता तरतूद करावी, अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात केली.
विजयपूर रस्त्यावरील धर्मवीर संभाजी महाराज तलाव विकसित करण्याची गरज आहे. त्याकरिता ५० कोटी रुपयांचा विस्तृत प्रकल्प अहवालदेखील तयार करण्यात आला आहे. हा तलाव परिसर विकसित केल्यास पर्यटकांना चांगले पर्यटन स्थळ उपलब्ध होईल.
सोलापूर शहराला ३६५ दिवस २४ तास पाणीपुरवठा करता यावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८९२ कोटी रुपयांची योजना नव्याने मंजूर केली आहे. तसेच सोलापूरसाठी समांतर जलवाहिनीदेखील पूर्ण झालेली आहे. या योजनेच्या पूर्ततेसाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळणार असून २०४७ सालचा विचार करून जागतिक बँकेने सुचवलेल्या सुधारणा शासनाने स्वीकारल्यामुळे हे काम लवकरच पूर्णत्वास जाईल, असेही आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले.
चौकट
स्वतंत्र विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची गरज
महाराष्ट्र राज्याचे स्वतंत्र विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय सुरू करावे. या माध्यमातून उद्योग, शेती, पाणी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, शहरी नियोजन या क्षेत्रात चांगले काम करता येईल. त्यामुळे सरकारने स्वतंत्र विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय सुरू करावे, अशी मागणी देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात केली.
——–
कोट
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. त्यामुळे मागील वर्षभरात सोलापूरकरांतर्फे मांडलेल्या जवळपास सगळ्या मागण्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. उर्वरित विकासकामेही लवकरच पूर्ण होतील असा विश्वास आहे. सोलापूरकरांना दिलेला विकासाचा शब्द पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य



