maharashtrapoliticalsocialsolapur

कांदा दर कोसळले; ३५०० वरून थेट ५००–१५०० रुपयांवर घसरण – सोलापूर बाजार समितीने तातडीने हस्तक्षेप करावा : रयत शेतकरी संघटनेचा इशारा

सोलापूर

कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले असून काही दिवसांपूर्वी प्रति क्विंटल ३५०० रुपये दर मिळणाऱ्या कांद्याला सध्या केवळ ५०० ते १५०० रुपये इतकाच भाव दिला जात आहे. दरातील या प्रचंड घसरणीमुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
या पार्श्वभूमीवर रयत शेतकरी संघटना यांच्या वतीने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांनी बाजार समितीचे सचिव अतुल राजपूत यांना निवेदन सादर करून कांद्याच्या दरातील घसरण रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन केले.

 

उत्पादन खर्च वाढला, दर मात्र कोसळले

 

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बियाणे, रासायनिक खते, कीडनाशके, मजुरी, वीज बिल, वाहतूक खर्च आदी सर्व घटकांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून कांद्याची लागवड केली आहे. मात्र सध्याच्या बाजारभावामुळे त्यांना तोटा सहन करावा लागत असून कर्जफेडीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
व्यापाऱ्यांवर नियंत्रण व हमीभावाची मागणी
संघटनेने बाजार समितीमार्फत लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, व्यापाऱ्यांकडून कृत्रिम दरकपात होत असल्यास त्यावर नियंत्रण ठेवावे तसेच शासनस्तरावर हमीभाव किंवा खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी विशेष बैठक बोलावून ठोस निर्णय घेण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.

आंदोलनाचा इशारा

 

जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. बाजार समितीने तातडीने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर रयत शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

 

दरम्यान, बाजार समिती प्रशासनाने निवेदनाची दखल घेत विषयावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. कांद्याच्या दराबाबत पुढील काही दिवसांत काय निर्णय घेतला जातो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button